‘त्या’ चार पॉझिटीव्ह रुग्णांवर गुन्हा दाखल

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 5 May 2020

नांदेड येथील लंगरसाहिब गुरूद्वारातील कर्मचारी, वजिराबाद पोलिस बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या शोधात. 

नांदेड : शहराच्या लंगरसाहिबमधील संशयित असलेल्या रुग्णांना क्वारंटाईन ठेवण्याऐवजी त्यांना सोडून दिलेली चूक नांदेडकरांच्या व प्रशासनाच्या मुळावर उठली आहे. या प्रकरणी अखेर महापालिकेच्या तक्रारीवरुन ‘त्या’ चार बेपत्ता कोरोनाग्रस्तांवर वजिराबाद पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. पाच) पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सुरवातीला लॉकडाउनमध्ये वाखान्‍याजोगे काम केले. मात्र हळूहळू त्यात ढीलाई दिल्याने कोरोनाचे रुग्ण आढळु लागले. शहर व जिल्हा २० एप्रिलपर्यंत ग्रीन झोनमध्ये होता. त्यानंतर नांदेडमधील पीरबुऱ्हाण नगर भागातून एक ६४ वर्षीय व्यक्तीला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आला. त्यानंतर २८ रोजी सेलूची त्यानंतर रहमतनगर येथील महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. या तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर पंजाब येथे यात्रेकरूंना सोडण्यासाठी गेलेल्या चार चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

हेही वाचाएक्साईजची धाडशी कारवाई : ६०० लीटर हातभट्टीसह ३२ आरोपींना अटक

वजिराबाद पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल 

दरम्यान नांदेड येथून पंजाब येथे गेलेल्या भाविकांना कोरोनाची लागण झाल्याची ओरड होत आहे. पंजाब सरकारकडून महाराष्ट्र सरकारला रोज आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. तेथील आरोग्यमंत्री ही आपल्या सरकारचा निषेध नोंदवित असून नुकसानाची दावा ठोकण्याची भाषा बोलू लागले आहेत. तर दुसरीकडे शनिवारी (ता. दोन) ज्या वीस जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले,

अहवाल येईपर्यंत नजरकैदेत ठेवणे अपेक्षीत होते

अशांना अहवाल येईपर्यंत नजरकैदेत ठेवणे अपेक्षीत होते. त्या वीसच्या वीस जणांना सोडून प्रशासन मोकळे झाले.यातील कोरोना बाधीत असलेले चार जण अद्याप सापडले नाहीत. अखेर जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरुन महापालिकेचे प्रयोग शाळा तंत्रज्ञ सुदर्शन गंगाराम आदमनवार (वय ३९) यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पुंगळे करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charges filed against 'those' four positive patients nanded news