
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांकडुन ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’
नांदेड : न्यायदानात मराठी भाषेचा वापर करावा, कारण न्यायालयाने दिलेला निकाल पक्षकारांना वाचून पाहता येईल. त्यामुळे त्याचे समाधान होईल व न्याय व्यवस्थेवर विश्वास बसेल. न्यायदानाच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर करावा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप यांनी केले. ते जिल्हा विधी सेवा प्राधीकरणच्या वतीने आयोजीत केलेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा’या कार्यक्रमात बोलत होते.
येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शनिवार (ता. २३) जानेवारी रोजी दुपारी चार वाजता ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे सचीव तथा न्यायाधीश राजेंद्र रोटे यांनी केले. न्यायाधीश रोटे यांनी आपल्या प्रास्ताविकेत मराठी भाषेचा वापर न्यायालयीन कामकाजात करण्याबाबत आवाहन केले.
हेही वाचा - कुंडलवाडी नगरपालिकेवर 2016 मध्ये भाजपाची एक हाती सत्ता प्रस्थापित होती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप होते. त्यांनी आपल्या भाषणात सर्व न्यायीक अधिका-यांना आवाहन केले की, न्यायालयातील खटल्यात न्यायनिर्णय व आदेश मराठी भाषेत करण्यात यावे. तसेच मराठी भाषेत न्यायनिर्णय दिल्यास सर्व पक्षकारांना न्यायनिर्णय वाचून समजून घेता येईल.
सदरील कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रा. वैजनाथ अनमुलवाड हे उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या भाषणात असे सांगितले की, मराठी भाषेचा शब्द भांडार वाढविणे आवश्यक आहे. इंग्रजीमधील कायद्याच्या शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधून त्याचा वापर आपल्या दैनंदिन कामकाजात करण्यात यावा. तसेच त्यांनी सांगितले की, काही बोलीभाषा वापरात नसल्यामुळे नष्ट झाल्या. त्यामुळे मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करण्यात यावा.
येथे क्लिक करा - नांदेड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प भरल्यानंतर पाणी प्रश्नांप्रती जागरुकता आवश्यक- पालकमंत्री अशोक चव्हाण
यावेळी जिल्हा न्यायाधीश (पहिले) एस. एस. खरात, जिल्हा सरकारी वकिल आशिष गोधमगांवकर, अभियोक्ता संघाचे जिल्हाध्यक्ष मिलींद लाठकर, स्वामी रामातिर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या सामाजीक शास्त्र विभागप्रमुख प्रा. डाॅ. उषा सरोदे, सर्व न्यायीक अधिकारी, विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी इत्यादी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. नय्युमखान पठाण यांनी केले तर आभार सह दिवाणी न्यायाधीश (सहावे) पी. यु. कुलकर्णी यांनी केले.