अभियंता कार्यालयात येत नसल्याने नागरिक संतप्त

सुरेश घाळे
Wednesday, 26 August 2020

धर्माबाद तालुक्यात रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने लाखो रुपये खर्च करूनही नागरिकांना त्रासच सहन करावा लागत आहे. 

धर्माबाद (नांदेड) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराने कळस गाठला आहे. तालुक्यात काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहे. याची देखभाल करण्यासाठी बांधकाम उपविभागाचा अधिकारी फिरकतही नाही. परिणामी रस्त्यांची कामे निकृष्ट होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 
 
येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अभियंता व गुत्तेदारांनी संगनमत करून शासनाला करोडो रुपयांचा चुना लावला आहे. तालुक्यातील रस्त्यांची चाळणी झालेली आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेला व वाहनधारकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. तर आजपर्यंत सदरील रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले असून ग्रामीण भागातून शहरात रूग्णांना किंवा महिलांना प्रस्तुतीसाठी वाहनात ये-जा करणे अवघड झाले आहे. 

धर्माबादच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील बहुतांश कर्मचारी व अभियंता गैरहजर राहतात. तालुक्यातील जनतेला लहान मोठ्या कामासाठी कार्यालयांकडे वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून येथील उपविभागीय अभियंता यांचा पदभार दुसऱ्याच तालुक्यातील उपविभागीय अभियंत्याकडे आहे. त्यामुळे येथील अभियंता व कर्मचाऱ्यांवर कुणाचाही अंकुश नसल्याने अभियंता व कर्मचारी गैरहजर राहून घरी बसून उंटावरून शेळ्या राखण्याचे काम करतात. कार्यालयात गैरहजर असलेल्या अभियंता व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी सतिश पाटील हारेगावकर, नगरसेवक संजय पवार, गौतम देवके, मारोती पाटील जाधव, सुनिल पाटील, राहुल भुतनारे, बंटी पाटील बाळापुरकर, एकनाथ जिंकले व इतरांनी केली आहे.

महापुरुषांचे फोटो कपाटावर धुळ खात... 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील अनेक महापुरुषांचे फोटो एका कपाटावर ठेवण्यात आल्यामुळे सदरील महापुरुषांच्या फोटोवर धुळ साचल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. संबधित उपविभागीय अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तहसिलदार दत्तात्रय शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यांनी तत्काळ दखल घेत मंडळ अधिकारी नामदेव माळोदे व तलाठी शेख मुर्तुजा यांना पाठविले. मंडळ अधिकारी नामदेव माळोदे यांनी कार्यालयात येऊन कार्यालयातील हजेरी पट व उपस्थित कर्मचारी यांची नोंद घेतली असता कार्यालयात दोनच कर्मचारी उपस्थित होते. महापुरुषांचे फोटो एका कपाटावर धुळ खात पडलेले आढळून आले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens are suffering due to deteriorating road works in Dharmabad taluka