मदरसे मिलिया उर्दू हायस्कुलची लिपीक आणि सदस्य लाचेच्या जाळ्यात

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 23 September 2020

देगलूर नाका परिसरात मदरसे मिलिया उर्दू उच्च प्राथमिक शाळा, इमरान कॉलनीमध्ये कार्यरत आहे. या शाळेत तक्रारदार यांची मुलगी इयत्ता चौथी आणि मुलगा इयत्ता दुसरीत शिक्षण घेतो.

नांदेड : वार्षिक निकालाचे गुणपत्रिका व शैक्षणिक पुस्तके देण्यासाठी लाच स्विकारणाऱ्या महिला लिपिकास व संस्था सदस्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास मदरसे मिलिया उर्दू उच्च माध्यमिक शाळा इमरान कॉलनी येथे करण्यात आली.

देगलूर नाका परिसरात मदरसे मिलिया उर्दू उच्च प्राथमिक शाळा, इमरान कॉलनीमध्ये कार्यरत आहे. या शाळेत तक्रारदार यांची मुलगी इयत्ता चौथी आणि मुलगा इयत्ता दुसरीत शिक्षण घेतो. परंतु या दोन्ही मुलांचे गुणपत्रक आणि शासनाकडून देण्यात आलेले मोफत पुस्तक देण्यासाठी संस्थेतील लिपिक अमिना सुलताना यास्मीन युसुफोद्दीन (वय ४५) व संस्थेचे सदस्य फईम उर्फ मोहम्मद हिस्साउद्दीन यांनी प्रत्येकी तीन हजार आणि नऊ हजार ९०० असे १२ हजार ९०० रुपयांची लाच मागितली.

हेही वाचा - Video - नांदेडच्या महापौरपदी कॉँग्रेसच्या मोहिनी येवनकर, उपमहापौरपदी मसूदखान

इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सदरची संस्था ही शासकीय मान्यता प्राप्त असून पुस्तकांच्या व गुणपत्रक यांच्या बदल्यात पैसे देण्याची आवश्यकता नाही. मग हे पैसे कशासाठी द्यायचे हा प्रश्न तक्रारदारासमोर पडला. तरीसुद्धा त्यांनी लाच देण्याचे मान्य केले. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ता. १५ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात येऊन संबंधितविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शासकिय पंचासमक्ष मागणी पडताळणी सापळा लावला. त्यात लिपिक अमीना व संस्था सदस्य फईम उर्फ मोहम्मद यांनी तक्रारदाराकडे १२ हजार ९०० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यावरुन एसीबीने मदरसे मिलिया उर्दू उच्च प्राथमिक शाळा येथे मंगळवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास सापळा लावला. यावेळी लिपिक अमिना आणि संस्थासदस्य फईम उर्फ मोहम्मद या दोघांना १२ हजार नऊशे रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एसीबीचे पोलिस निरीक्षक राहुल पखाले करत आहेत.

येथे क्लिक करा -  नांदेड जिल्ह्यात त्रुटींअभावी एक हजारावर विद्यार्थी प्रवेशापासून वंचितच

सापळा कारवाईत यांचा होता सहभाग

सदरची सापळा कारवाई पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल पखाले, पोलिस नायक बालाजी तेलंगे, हनुमंत बोरकर, गणेश तालकोकुलवार, सचिन गायकवाड, शेख मुजीब, भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या रेणुका पवार, शुभांगी कोलबुके यांनी पार पाडली. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक याने एसएमएस किंवा व्हिडिओ, ऑडिओ क्लिप असल्यास भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा. टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक १०६४ किंवा नांदेड कार्यालयाचा ०२४६२-२५३५१३ किंवा पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clerk and member of Madrasa Millia Urdu High School in bribery nanded news