esakal | कुंडलवाडीत लिपीकास लाथबुक्यानी मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कुंडलवाडी (ति. बिलोली) येथील एका लिपिकास मारहाण तर दुसऱ्या घटनेत भूकमारी (ता. कंधार) शिवारातून सात गोवंश चोरीला.

कुंडलवाडीत लिपीकास लाथबुक्यानी मारहाण

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कुंडलवाडी येथील नगरपरिषदमध्ये शासकिय काम करणाऱ्या एका लिपीकास तेथील काही जणांनी येऊन आमचे काम का करत नाहीस म्हणून लाथाबुक्यानी मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (ता. पाच) दुपारी दोनच्या सुमारास घडला. 

कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील नगरपरिषदमध्ये कार्यरत लिपीक व त्यांचा एक सहकारी कर्मचारी हे दोघेजण शासकिय कामासाठी मराठा गल्ली, पीठाची गीरणी परिसरात मंगळवारी (ता. पाच) गेले होते. तिथे त्यांना काही लोकांना वाद घालून परत पाठविले. नगरपरिषदमध्ये आल्यानंतर वाद घालणाऱ्या काहीनी नगरपरिषदमध्ये प्रवेश केला. यावेळी लिपीक गंगाधर शंकरराव पत्की हे आपले काम करत होते. तु आमचे काम का करत नाहीस म्हणून त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. नगरपरिषदमध्ये दहशत निर्माण करून श्री. पत्की यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच शासकिय कामात अडथळा निर्माण केला. गंगाधर पत्की यांच्या फिर्यादीवरुन कुंडलवाडी पोलिस ठाण्यात मारेकऱ्यांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. मान्टे करत आहेत. 

हेही वाचा -  बुद्ध पौर्णिमा : बुद्धविचार म्हणजे अहिंसेचा- शांतीचा

आखाड्यावरुन सात गोवंश चोरीला 

नांदेड : भुकमारी (ता. कंधार) शिवारातील एका आखाड्यावरुन सात गोवंश चोरीला गेल्याची घटना मंगळवारी (ता. पाच) पहाटे दोन ते चारच्या सुमारास घडली. एक लाख १० हजार रुपये किंमतीची गोवंश चोरीला गेल्याचा गुन्हा उस्माननगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भूकमारी (ता. कंधार) शिवारात संजय बियाणी यांची शेती आहे. त्यांनी आपल्या आखाड्यावर गोवंश पाळले होते. त्यात चार गायी व तीन वासरे होती. आखाड्यावर त्यांचा सालगडी गजानन विठ्ठल पानबुडे (वय ३५) यांनी रात्री जनावरांना चारापाणी करुन सर्व जनावरे गोठ्यात बांधून ते आपल्या कुटुंबीयांसह झोपी गेले. 

उस्माननगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

बुधवारी सकाळी उठून पाहतो तर गोठ्यातील एक लाख १० हजार रुपये किंमतीच्या चार गायी व तीन वासरे हे दिसून आले नाही. त्यांनी शिवारात सर्वत्र शोध घेतला. परंतु सापडली नसल्याने त्याने मालक संजय बियाणी यांना कळविले. संजय बियाणी यांनीसुद्धा आपल्या शेताकडे धाव घेतली. गजानन पानबुडे यांच्या फिर्यादीवरुन उस्माननगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. थोरे करत आहेत.  


 

loading image