esakal | सोयाबीन बियाणे तक्रारीबाबत जिल्हाधिकारी बांधावर....कुठे ते वाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

NNN23KJP02.jpg

जिल्ह्यात यंदा सोयाबीन पेरल्यानंतर ते बियाणे उगवले नसल्याचा प्रकार पेरणीनंतर शेतकऱ्यांच्या लक्षात आला. मृग नक्षत्रातील पावसानंतर शेतकऱ्यांनी ता. दहा जून पासून पेरणीला प्रारंभ केला. या काळात पेरणी झालेल्या सोयाबीनची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून प्राप्त होत आहेत.

सोयाबीन बियाणे तक्रारीबाबत जिल्हाधिकारी बांधावर....कुठे ते वाचा 

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे बियाणे पेरल्यानंतर ते उगवले नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी मंगळवारी (ता. २३) कासारखेडा येथील शिवारात भेट देऊन सोयाबीन शेतीसह शेतकऱ्यांची चर्चा केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे उपस्थित होते. जिल्ह्यात आजपर्यंत चारशेपेक्षा अधिक तक्रारी आल्याची माहिती त्यांनी दिली.

सर्वच तालुक्यातून तक्रारी प्राप्त 
जिल्ह्यात यंदा सोयाबीन पेरल्यानंतर ते बियाणे उगवले नसल्याचा प्रकार पेरणीनंतर शेतकऱ्यांच्या लक्षात आला. मृग नक्षत्रातील पावसानंतर शेतकऱ्यांनी ता. दहा जून पासून पेरणीला प्रारंभ केला. या काळात पेरणी झालेल्या सोयाबीनची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून प्राप्त होत आहेत. नामांकित बियाणे उत्पादक कंपन्यांनी बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्यामुळे शेकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे बियाणे, खत तसेच मजुरी भरपाई म्हणून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

हेही वाचा.....Video - बोगस बियाणेप्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक, कुठे ते वाचा... ​

राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांचे निवेदन
राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनीही सदोष बियाणे शेतकऱ्यांना विकणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर तसेच नायगावचे आमदार राजेश पवार यांनीही जिल्हा अधीक्षकांसह राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे तक्रार करून सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसविल्याचा आरोप केला. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे. 

हेही वाचलेच पाहिजे.....सोयाबीनच उगवलेच नाही; मग सुरू झाला तक्रारींचा ओघ

जिल्हाधिकाऱ्यांची प्रक्षेत्रावर भेट
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी धर्माबाद तसेच इतर तालुक्याचा दौरा करून पेरणी झालेल्या शिवाराची पाहणी केली. यावेळी त्यांना बियाणे उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी मंगळवारी (ता. २३) नांदेड तालुक्यातील कासारखेडा शिवारात भेट दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी शिणगारे यासह कृषी व महसूल विभागाचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची संवाद साधत बियाणाबाबत माहिती घेतली.

चारशेवर तक्रारी दाखल
जिल्ह्यातून आजपर्यंत चारशेंच्यावर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीबाबत तालुकास्तरीय समितीकडून पंचनामा करण्यात येणार आहे. या समितीच्या अहवालानुसार जिल्ह्याचा एकत्रित गोषवारा विभागीय कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन अहवाल कळविण्यात येणार असल्याची माहिती श्री चलवदे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

कृषी विक्रेत्यांकडून पोलिस संरक्षणाची मागणी
बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कृषी सेवा केंद्र चालकांना जाब विचारत आहेत. याबाबत कृषी विक्रेत्यांनी पोलिस संरक्षण देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. कंपनीकडून उत्पादित होणारे बियाणे सीलबंद थैलीमध्ये व्यापाऱ्याकडून विक्री केले जाते. त्यामुळे बियाणे उगवण्याबाबत दुकानदाराला सर्वाधिक त्रास होत असल्याचे नांदेड जिल्हा सीड्स फर्टीलायझर अँड पेस्टिसाइड डीलर्स असोसिएशनच्यावतीने म्हटले आहे. यामुळे कृषी सेवा केंद्र चालकांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष मधुकर मामडे, उपाध्यक्ष जुगलकिशोर अग्रवाल, विजयकुमार कासट, सचिव दिवाकर वैद्य, कोषाध्यक्ष मुकेश गुप्ता यांनी केली आहे.

loading image
go to top