जिल्हाधिकाऱ्यांची ‘या’ मत्स्यव्यवसाय प्रकल्पाला भेट

एकनाथ तिडके
Monday, 31 August 2020


जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटणकर यांनी रविवारी (ता.३०) ऑगस्ट रोजी लिंबोटी धरण येथील जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी उभारलेल्या पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पाला भेट दिली व पाहणी केली. या वेळी त्यांनी सदर प्रकल्पाचे कौतुक करून चंद्रसेन पाटील यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकल्पाची सविस्तर माहिती जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांच्याकडून घेतली.

माळाकोळी, (ता.लोहा, जि. नांदेड) ः जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटणकर यांनी रविवारी (ता.३०) ऑगस्ट रोजी लिंबोटी धरण येथील जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी उभारलेल्या पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पाला भेट दिली व पाहणी केली. या वेळी त्यांनी सदर प्रकल्पाचे कौतुक करून चंद्रसेन पाटील यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकल्पाची सविस्तर माहिती जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांच्याकडून घेतली.

हेही वाचा -  किनवटजवळ झालेल्या दुचाकींच्या अपघातात चार ठार
 

या वेळी त्यांच्या समवेत आमदार शामसुंदर शिंदे, महापालिका आयुक्त सुनील लहाने, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, तहसीलदार विठ्ठल परळीकर, मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त श्री. बादावार, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी सुरज कोल्हे, मत्स्यव्यवसाय कार्यालय अधीक्षक चंद्रमणी सोनटक्के यांच्यासह अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पर्यटनाच्यादृष्टीने विकास केला तर...
मत्स्यव्यवसाय प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणाले, मराठवाड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेला पिंजरा पद्धतीचा मत्स्यव्यवसायाचा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत आहेत. शिवाय चांगले उत्पादनही मिळत आहे, असा प्रकल्प जिल्ह्यात अन्य ठिकाणी उभारण्यासाठी प्रयत्न केले जावेत त्यासाठी आपण निश्चितपणे मदत करू. लिंबोटी धरण परिसरात या व्यवसायाशिवाय पर्यटनाच्यादृष्टीने विकास केला तर त्यातूनही अनेकांना रोजगार मिळू शकतो असेही ते यावेळी म्हणाले.

धरणात बोटिंगचा आनंद
या वेळी जिल्हाधिकाऱ्यांसह त्यांचे चिरंजीव आर्यन व इतर सर्व अधिकाऱ्यांनी लिंबोटी धरणात बोटिंगचा आनंद घेतला. शिवाय या वेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी माळेगाव तीर्थक्षेत्र विकास कामास गती देणे, लिंबोटी येथील रस्ता व परिसरातील इतर गावांच्या विकास कामांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी माजी सरपंच केरबा धुळगुंडे, उपसरपंच पंडितराव वारकड, चोंडीचे सरपंच श्री जाधव, चंद्रकांत गोकुंडे, संदीप साखरे, लिंबोटीचे उपसरपंच कालिदास डोईफोडे, केशवराव सुरनर, केशव धुळगुंडे, भानुदास पाटील, उत्तमराव मंगरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन - स्वप्निल गायकवाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector's Visit To Fisheries Project, Nanded News