esakal | रस्त्यावर दगड टाकून गुत्तेदार फरार, कुठे ते वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

वस्तीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करून चालावे लागते. रस्त्यावर मोठे- मोठे दगड असल्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांना दगड उचलावे लागत असल्याने तिव्र संताप व्यक्त केला जात असून या गंभीर बाबीकडे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे

रस्त्यावर दगड टाकून गुत्तेदार फरार, कुठे ते वाचा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडगा (ता. नायगाव) : नायगाव तालुक्यातील गडगा येथील दलित वस्तीतील सिमेंट रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावर दगड टाकून तीन महिने उलटले तरी गुत्तेदाराने कामास सुरवात केली नसल्यामुळे वस्तीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करून चालावे लागते. रस्त्यावर मोठे- मोठे दगड असल्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांना दगड उचलावे लागत असल्याने तिव्र संताप व्यक्त केला जात असून या गंभीर बाबीकडे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

कामाची प्रशासकीय मान्यता घेऊन गुत्तेदाराने सत्तर हजार रूपये घेऊन गेल्या तीन महिन्यांपासून गायब आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन सदरील दलित वस्तीतील सिमेंट रस्त्याच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. जिल्हा परिषद अंतर्गत दलित वस्तीसाठी आलेला निधीचे नियमानुसार वाटप होऊनही या निधीचा दुरुपयोग केला जातो. दलित वस्तीच्या विकासाऐवजी ग्रामविकास अधिकारी व गुत्तेदारासह अन्य काही जणांनी संगनमत करून सत्तर हजारांची उचल करून काम चालू न करता गुत्तेदार व ग्रामविकास अधिकारी निवांत असल्याचे निदर्शनास येत आहे. शासकीय गुत्तेदारांना डावलून खासगी गुत्तेदाराला कामे देवून संबंधित अधिकाऱ्यांनी आपले हात ओले करून घेतली काय असेही चर्चा केली जात आहे.

हेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांची दुचाकीवरुन सवारी, वाळू माफियांचे धाबे दणाणले

कामे न करता चक्क बोगस बिले काढण्याचा प्रयत्न 

संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी कामे न करता चक्क बोगस बिले काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच गुत्तेदाराकडून दलित वस्तीतील कामामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले असताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याच खासगी गुत्तेदाराला कामे देवून डल्ला मारण्याचा उद्योग करित असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या वस्तीतील पाऊल रस्ते पावसामुळे बंद झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामकाजसाठी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

ये- जा करणाऱ्या नागरिकांना त्रास 

गुत्तेदाराने सत्तर हजार रूपये घेऊन गायब झाला आहे. ३२ हजार रूपये संबंधित गुत्तेदाराकडून वसूल केले आहेत. उर्वरित रक्कम तातडीने वसूल करणार आहे. रस्त्यावर दगड असल्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत असून लॉकडाऊनमुळे काम चालू करण्यास उशीर झाला आहे. तीन ते चार दिवसांमध्ये काम चालू करण्यात येईल.
- रफी अमिरखॉन पठाण, ग्रामविकास अधिकारी नायगाव.