Video : कंत्राटदारांनी नांदेडमध्ये केली शासन निर्णयाची होळी, काय आहे कारण? ते वाचाच

प्रमोद चौधरी
Tuesday, 11 August 2020

आम्हाला दर्जेदार कामे करायची आहेत. सर्व नियमांचे पालन करायचे आहे. कोणताही कंत्राटदार हा आपल्या रोजीरोटीशी बेईमान होत नाही, तरीसुद्धा विनाकारण मोठमोठे शब्द वापरून कंत्राटदारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या शासन निर्णयाद्वारे करण्यात आला असल्याची प्रखर टिका संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिकराव हेंद्रे यांनी केली आहे.

नांदेड : ३० जुलै २०२० रोजी कंत्राटदारांच्या विरोधात शासनाने निर्णय घेतला आहे.  त्या निर्णयाच्या परिपत्रकाची सोमवारी (ता.१० आॅगस्ट) सार्वजनिक बांधकाम मंडळ  येथील कार्यालयासमोर बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या नांदेड, परभणी आणि हिंगोली शाखेच्या वतीने होळी केली. 

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर नांदेड, परभणी आणि हिंगोलीचे सर्व सदस्य तथा इतर सर्व कंत्राटदारांनी महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम खात्याने ३० जुलै रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचा निषेध म्हणून शासन निर्णयाची होळी केली. यावेळी बोलताना संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबुराव शक्करवार म्हणाले की, शासनाने काढलेला निर्णय कंत्राटदारांना देशद्रोही ठरवणारा आहे, तसेच इतरही जाचक अटी त्यामध्ये लादलेल्या आहेत.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात वाढली गुन्हेगारी, सोमवारी रात्री पुन्हा एका युवकाचा खून  

शासनाचा नवीन निर्णय म्हणजे कंत्राटदारांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित रद्द करावा. तसेच सार्वजनिक बांधकाम खात्यात अधिकारी व कंत्राटदार हे नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात. कंत्राटदाराशिवाय या खात्यात एकही काम होऊ शकत नाही. अशा मूळ गाभ्यालाच देशद्रोही संबोधने कितपत योग्य आहे. या शासन निर्णयात अनेक जाचक अन्यायकारक अटींचा समावेश असल्याचे श्री. शक्करवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 

शासन निर्णय रद्द कारावा
या शासन निर्णयामुळे कंत्राटदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून ते तणावाखाली आले आहेत. निर्णयातील सर्व जाचक अटींमुळे कंत्राटदाराने काम करणे बंद केले तर या विभागात हाहाकार माजून जाईल. तसेच ब्लॅकमेलर्सना या शासन निर्णयामुळे अधिकारीवर्ग व कंत्राटदार दोघांनाही ब्लॅकमेल करण्यासाठी फार मोठे कुरण उपलब्ध होईल. त्यामुळे देशद्रोही म्हणून कंत्राटदारास संबोधू नये, तसेच सदरील शासन निर्णय संपूर्णपणे त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने केली आहे.

हे देखील वाचा - ‘या’ गावात भरपूर दूध, पण दुधाचा एकही थेंब विकला जात नाही

यांचा होता सहभाग
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबुराव शक्करवार, नांदेड जिल्हाध्यक्ष माणिकराव हेंद्रे, परभणी जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील, हिंगोली जिल्हाध्यक्ष मयूर कयाल, राष्ट्रीय व्यवस्थापण समिती सदस्य नरेश पैंजणे, सुशिक्षित बेरोजगार अभियंताचे जिल्हाध्यक्ष  दिलीप बाळसकर, ए.एम. हाकीम, व्ही.व्ही. मामीडवार, अविनाश रावळकर, मनोज मोरे, दीपकसिंघ फौजी, एन.एस. शेट्टी, माधवराव एकलारे, संदीप पटणे, राहुल जांगीड, म. नजीर, नरेश परतानी, सुनील जोशी, राजू चापके, उबारे, ओंकार वटमे आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contractors Protest Government GR Nanded News