कोरोना@४४० ः नांदेडला आज पुन्हा तीन पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

शहरापासून दूर असलेली गावे कोरोनाच्या विळख्यात सापडु नयेत यासाठी खद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना तशा सुचना दिल्या आहेत. परंतु महानगराप्रमाणेच गाव खेड्यात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.    

नांदेड :  रविवारी (ता. पाच जुलै) दिवसभरात पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर रात्री उशिराने पुन्हा नऊ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर सोमवारी (ता. सहा जुलै) पुन्हा तीन बाधीतांची त्यात भर पडल्याने संख्या आता ४४० झाली असल्याचे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगीतले. 

मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील विविध तालुके आणि गावात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी आलेल्या अहवालात नायगाव तालुक्यातील बोमनाळे गल्ली येथील (५४) पुरुष, मुखेड तागलेन गल्ली (६५) पुरुष, नाथ नगर देगलुर येथील (३३) वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. 

हेही वाचा- आता नवे संकट : सोयाबीन पिकावर पिवळी छटा

या भागात सापडले रुग्ण

रविवारी (ता. पाच) सकाळी पाच आणि सायंकाळी उशिराने आलेल्या ३४ अहवालामध्ये नऊ पॉझिटिव्ह आल्याने दिवसभरात १४ रुग्णांची भर पडली होती. मोहशिन कॉलनी देगलुरनाका नांदेड येथील (२०) पुरुष तर २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. श्यामनगर नांदेड (२०) महिला, श्रीनगर (४९) महिला, मस्तानशहानगर हिंगोली (२२) पुरुष, विष्णुपुरी येथील २९ वर्षीय दोन व्यक्ती, किनवट (४५) पुरुष आणि एक पुरुष हिमायतनगर येथील वनसारसी गल्लीतील रहिवाशी आहेत. रविवारी १९० प्रलंबित स्वॅबची तपासणी सुरु होती. सोमवारी सकाळी प्राप्त झालेल्या अवहालात पुन्हा तीन जण पॉझिटिव्ह निघाल्याने जिल्ह्यातील रुग्ण संख्या ४४० झाली आहे. 

हेही वाचा- खरीप पिक कर्ज वाटपात ही बॅँक ठरली अव्वल... ​

ग्रामीण भागही कोरोनाच्या विळख्यात

ग्रामीण भागात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गाव खेड्यांना कोरोनापासून दूर ठवण्याचा कितीही प्रयत्न होत असला तरी, कामाच्या निमित्ताने परगावी गेलेले ग्रामस्थ परत गावात येत असल्याने गावात कोरोनाचा फैलाव होत असल्याचे दिसून येते.त्यात काही बाधितांच्या संपर्कातीलही आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून गावच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची साखळी तोडणे अशक्य असल्याचे मत शहरातील काही तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.   

कोरोनाची संक्षिप्त माहिती 
- आज सकाळी - तीन रुग्ण पॉझिटिव्ह 
- एकूण रुग्णसंख्या - ४४० 
- बरे झालेले रुग्ण - ३२१ 
- उपचार सुरु- ९९ 
- मृत्यू- २० 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona @ 440 Nanded Again Three Positives Today Nanded News