नांदेड जिल्ह्यातील सगरोळीत कोरोनाचा दे धक्का....११ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग...

अभिजीत महाजन
Tuesday, 28 July 2020

एका ६२ वर्षीय पुरुष कोरोना बाधित व्यक्तीपासून ११ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे

सगरोळी (ता. बिलोली, जिल्हा नांदेड) : चार महिन्यानंतर अखेर सगरोळी (ता. बिलोली) येथे कोरोनाने शिरकाव केला असून एका ६२ वर्षीय पुरुष कोरोना बाधित व्यक्तीपासून ११ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

येथील ६२ वर्षीय पुरुषास आठ दिवसांपूर्वी ऱ्हदय रोगाचा त्रास झाल्याने कुटुंबीयांनी हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी सर्व तपासण्या झाल्यानंतर कोरोनाची लक्षणे त्यांच्यामध्ये आढळली असल्याने त्या रुग्णालयाने नांदेड येथे शासकीय रुग्णालयात दाखल होण्याच्या सूचना केल्या. शनिवार (ता. २५) रोजी नांदेड येथे शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर कोरोनाची तपासणी केली असता सदर व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. बाधित व्यक्तीच्या कुटुंब व संपर्कातील १४ व्यक्तींना तत्काळ बिलोली येथील कोविड सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेऊन त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. मंगळवार (ता. २८) रोजी सकाळी अहवाल प्राप्त झाला असून ह्या १४ व्यक्तींपैकी तब्बल ११ व्यक्तींना संसर्ग झाला तर दोघांचा नकारात्मक व एक व्यक्तीचा अहवाल नाकारण्यात आला आहे. सगरोळीमध्ये चार महिन्यानंतर प्रथमच कोरोनाने रविवारी एका व्यक्तीपासून शिरकाव केला त्यामुळे सोमवारी येथील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. बाधित व्यक्तीच्या घराचा परिसरहि  प्रशासनाने  बंद केला होता.

हेही वाचादुचाकी चोरट्यांकडून सहा दुचाकीसह साडेतीन लाखाचा ऐवज जप्त- नांदेड पोलिस

काळजी व नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन

मागील चार महिन्यापासून येथील ग्रामपंचायात व प्रशासनाने विशेष काळजी घेतली होती. त्यामुळे येथील संपूर्ण परिसर हा ग्रीनझोन मध्ये होता. रविवारी (ता. २६) रोजी सायंकाळी ६२ वर्षीय पुरुषास कोरोनाचा संसर्ग  झाल्याची माहिती येताच सगरोळी व परिसरात चर्चेला उधान आले होते. त्यानंतर अकरा नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रशासन सतर्क झाले असून प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी. अनावश्यक घराबाहेर पडू नये, मनामध्ये भीती बाळगू नये, प्रशासनाच्या नियमांचे सर्वांनी  पालन करण्याचे अवाहन  करण्यात आले आहे.

सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीची बैठक

पुढील उपाययोजनेसाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मंगळवारी दुपारी तालुका आरोग्य अधिकारांच्या उपस्थितीत तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. यामध्ये गट विकास अधिकारी श्री. नाईक, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी गणेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी सातमवाड, डॉ. विनोद माहुरे,  सरपंच प्रतिनिधी व्यंकट सिद्नोड, उपसरपंच रोहित देशमुख व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona bite in Sagaroli in Nanded district 11 people infected with corona nanded news