कोरोना ब्रेकिंग- नांदेड कारागृहातील ८१ कैद्यांना लागन

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 9 September 2020

जिल्हा कारागृहातील तब्बल ८१ कैद्यांना कारोनाची लागन झाल्याचे ॲटीजेन रॅपीड टेस्ट तपासणीत पुढे आले आहे. यामुळे कारागृहातील अन्य कैदी व कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

नांदेड : जिल्ह्यात कोरोना आपले हातपाय चांगलेच पसरत असून जिल्हा प्रशासन हतबल झाले आहे. शासकिय व खासगी रुग्णालयात कोरोना बाधीतांना उपचार कण्यासाठी जागा उपलब्ध मिळत नसल्याची ओरड सर्वत्र होत आहे. त्यातच आता जिल्हा कारागृहातील तब्बल ८१ कैद्यांना कारोनाची लागन झाल्याचे ॲटीजेन रॅपीड टेस्ट तपासणीत पुढे आले आहे. यामुळे कारागृहातील अन्य कैदी व कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

नांदेड जिल्ह्यात सर्वच क्षेत्रातील नागरिकांना कोरोनाची बाधा पोहचलेली आहे. दररोज तीनशेहून अधिक रुग्ण समोर येत आहेत. तर शंभरपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज दिल्या जात आहे. कोरोना बाधीतांची संख्या वाढत असताना मृत्यूंचा आकडाही तसाच वाढत असल्याने प्रशासन हतबल होत असल्याचे पहावयास मिळत आहे. कोरोना बाधितांची संख्या रोखण्यास जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांना या बाबत सध्या तरी अपयश येत असल्याचे दिसून येते. 

हेही वाचा गंभीर - रामघाटावर अंत्यविधीला नांदेडकरांची ‘या’ कारणासाठी होतेय अडवणूक -

बाधीत रुग्णांवर उपचार आपल्या घरीच घ्यावा लागत आहे

कोरोना बाधीत क्षेत्रातील नागरिकांसह सर्दी व ताप असलेल्या सर्वांची तपासणी ॲन्टीजेन रॅपीड टेस्टद्वारे होत आहे. त्यात तपासणी केल्यानंतर काही मिनिटातच रुग्णाचा अहवाल येत आहे. त्यामुळे अहवालाची वाट पाहण्याची वेळ आता तपासणी केलेल्या व्यक्तीला गरज नाही. शहराच्या विविध भागात ॲन्टीजेन टेस्ट करून कोरोना बाधीत आढळल्यास त्याच्‍यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत. परंतु सध्या खासगी व शासकिय रुग्णालय फुल्ल झाल्याने बाधीत रुग्णांवर उपचार आपल्या घरीच घ्यावा लागत आहे.

कारागृहातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु

दोन दिवसापासून जिल्हा कारागृहात न्यायालयाच्या आदेशावरुन कैदी व तेथील कर्मचाऱ्यांची ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आली. या तपासणीत एक नव्हे तर तब्बल ८० कैदी आणि एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागन झाल्याचे तपासणीत पुढे आले आहे. त्यामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सध्या कारागृहात २९१ कैदी असून न्यायालयीन कोठडीत असलेल्यांना वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवण्यात येत आहे. या सर्वांवर कारागृहातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु असून कोणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्या श्री.चांदणे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking: 81 inmates lodged in Nanded Jail nanded news