कोरोना ब्रेकिंग - नांदेडला कोरोनाचा अठरावा बळी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

मागील १२ दिवसापासून कोविड - १९ च्या या आजारावर उपचार सुरु असलेल्या महिलेस उच्चरक्तदाब, मधुमेह आणि श्वासनाचा त्रास असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. तिच्याकडून उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.

नांदेड :  मागील बारा दिवसापासून उपचार सुरु असलेल्या ५२ वर्षीय पॉझिटिव्ह महिलेचा गुरुवारी (ता. दोन) जुलै संध्याकाळी पावने नऊच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या ३९८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

चौफाळा भागातील ५२ वर्षीय महिला (ता. नऊ) जून रोजी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झाली होती. त्यानंतर दहा जूनला तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मागील १२ दिवसापासून कोविड - १९ च्या या आजारावर उपचार सुरु असलेल्या महिलेस उच्चरक्तदाब, मधुमेह आणि श्वासनाचा त्रास असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. तिच्याकडून उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.

हेही वाचा- हा जिल्हा २०२५ पर्यंत हिवताप मुक्त होणार ​

 ५८ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

गुरुवारी सकाळी २८ आणि सायंकाळी ५१ असे दिवसभरात ७९ अहवाल प्राप्त झाले. यात सकाळी पाच तर, सायंकाळी दोन असे दिवसभरात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढुळुन आले आहेत. यापैकी निजाम कॉलनी, खुदबईनगर येथील ६० व ४० वर्षाच्या दोन महिलांचा तर, जुना मोंढा (वय ३६), हैदरबाग (वय ५३), म्हाडा कॉलनी (३५), आंबेडकरनगर (८०) आणि मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील एका ३० वर्ष अशा पाच पुरुष मिळून सात बाधितांचा यात समावेश आहे. एकुण प्राप्त झालेल्या अहवाल पैकी ५८ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले तर, नऊ अहवाल अनिर्णित अवस्थेत ठेवण्यात आले होते.
 
हेही वाचा-  पोलिस अन् दरोडेखोर समोरासमोर; पुढे काय घडले वाचाच... ​

९० स्वॅब तपासणी सुरु

गुरुवारी दिवसभरात सात बाधितांची भर पडली असली तरी, पंजाब भवन कोविड केअर सेंटर मधील तीन, विष्णुपुरीच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील एक व औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आलेले दोन असे एकुण सहा रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या बाधीत रुग्णसंख्या ३९८ इतकी झाली असून, गुरुवारी संध्याकाळपर्यंत २९८ रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ८२ बाधीत रुग्णावर उपचार सुरु आहे. तर आत्तापर्यंत १८ कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी ९० स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या स्वॅबचा शुक्रवारी (ता. तीन) सकाळी साडेआकरा पर्यंत अहवाल प्राप्त झाला नव्हता. त्यांचा शुक्रावारी संध्याकाळपर्यंत अहवाल येण्याची शक्यता असल्याचे डॉ. भोसीकर म्हणाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking - Corona's 18th Victim To Nanded Nanded News