esakal | Corona Breaking : नांदेड जिल्ह्यात पॉझिटिव्हचे द्विशतक; दोघांचा बळी; १० पॉझिटिव्हची भर
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दोनशेपेक्षा अधिक झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनावर विजय मिळवून घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या सव्वाशेपेक्षा अधिक आहे. काही दिवसांपासून जिल्ह्यातील प्रतिष्ठाने, लहान मोठे उद्योग - व्यवसाय सुरु करण्यात आली आहेत. परंतु याच दरम्यान जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नांदेडची चिंता वाढली आहे. 

Corona Breaking : नांदेड जिल्ह्यात पॉझिटिव्हचे द्विशतक; दोघांचा बळी; १० पॉझिटिव्हची भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी मंगळवार (ता. नऊ) पर्यंत जिल्ह्यात केवळ नऊ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. परंतु बुधवारी (ता. दहा) एकाच दिवशी दोघांचा बळी तर वीस तासात १२ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

मंगळवारी प्रलंबित असलेल्या स्वॅबपैकी बुधवारी (ता. दहा) ६० स्वॅब अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ४९ स्वॅब नमुने अहवाल निगेटिव्ह तर दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी मंगळवारी (ता. नऊ) रात्री उशिरा दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे २० तासात १२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या २०३ एवढी झाली आहे. तर ११ पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

हेही वाचा- धोपटी आंंदोलकांवर गुन्हे दाखल...कुठे ते वाचा... ?

सहा महिण्याच्या बालकास कोरोनाची लागण

बुधवारी (ता. दहा) मृत्यू झालेल्या दोन रुग्णापैकी एक रुग्ण शहरातील इतवारा भागातील ६५ वर्षीय व्यक्ती असून, दुसरा रुग्ण हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील ४५ वर्षीय असल्याचे सांगण्यात आले. वरील दोन्ही रुग्णावर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मृत्यू झालेल्या रुग्णास उच्चरक्तदाब, श्वासनाचा त्रास आणि मधुमेह आजार होते. तर नव्याने पॉझिटिव्ह रुग्णामध्ये आठ पुरुषांचा समावेश असून, त्यांचे वय अनुक्रमे १२, ४३, ४५, ४७, ४८, ५४, ५५ व सहा महिण्याच्या एका बालकाचा समावेश आहे. त्यातील पाच रुग्ण इतवारा भागातील असून, एक रुग्ण मालेगाव रोड आणि दोन रुग्ण सिडको परिसरातील आहेत. तर दोन पॉझिटिव्ह महिला रुग्णाचे वय दहा आणि ५० वर्ष वयोगटातील असून, हे इतवारा व चौफाळा येथील असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.
 
हेही वाचा- कशासाठी करायचा असतो व्यायाम, तुम्ही वाचा आणि पहा (व्हिडीओ) ​

७९ स्वॅबची प्रतिक्षा

२०३ पॉझिटिव्ह रुग्णापैकी १३७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर ५५ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यातील तीन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. बुधवारी (ता. दहा) पुन्हा नव्याने ७९ स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून, गुरुवारी (ता. ११) संध्याकाळपर्यंत हे अहवाल प्राप्त होण्याची शक्यता असल्याचे डॉ. भोसीकर यांनी माहिती दिली.