गुलाबांची फुले झाली मातीमोल

लक्ष्मिकांत मुळे
Tuesday, 19 May 2020


संपूर्ण देशात व जगात कोरोनाविषयी हाहाकार माजला आहे. सगळीकडे लॉकडाऊन झाले असून मंदीची लाट येत आहे. अशातच अनेकांचे छोटे-मोठे उद्योगधंदे बंद होण्यास सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील तोंडाशी आलेले पीक शेतातच सडत आहे. अनेकांनी पिकावर नांगर फिरवण्याच्या घटना पहावयास मिळाल्या आहेत, तर काहींनी शेतात जनावरे सोडून राग व्यक्त केला.

अर्धापूर, (जि. नांदेड) ः कोरोनामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. अर्धापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी फुलांची शेती केली आहे. पिक हाताशी आले असताना अचानक लॉकडाऊन करण्यात आल्याने त्यांच्या शेतातील संपूर्ण फुले सुकू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे दिसत आहे. शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी फुल उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.

 

हेही वाचा -  वादग्रस्त प्रस्तावीत नांदेड शहर विकास आराखडा रद्द करा- आरक्षण संघर्ष समिती
 

अर्धापूर तालुका परिसरातील खडकुत, दाभड, पिंपळगाव, पार्डी, शेणी, अर्धापूर आदी गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत गुलाब आदी जातीच्या फुल झाडांची अतिशय मेहनत करून लागवड केली. तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याची जोपासना केली आणि त्यांचा प्रयोग यशस्वीही ठरला. अत्यंत देखणी फुलबाग तयार झाली आणि फुल लागायला सुरवात झाली. त्याचा अत्यानंद झाला. आपल्या कष्टाला कष्टाच्या घामाने फुलवलेल्या फुल बागेतील फुले आपल्याला आर्थिक दृष्ट्या संपन्न बनवतील ही स्वप्ने पहात असतानाच विषाणूंचे संक्रमण केले आणि सगळीकडे हाहाकार माजला आणि भारत सरकारने लॉकडाऊन केल्याने संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. देवालये बंद झाली, लग्न आदी कार्यक्रम रद्द झाली. तोडणीला आलेली फुले गळून जात आहेत. या सगळ्या परिस्थितीतून बागेसाठी लावलेला पैसा आणि मेहनत वाया गेल्याने लाखांचे नुकसान झाले आहे. अर्धापूर तालुक्यातील व राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे, सरकारने याची दखल घ्यावी व अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत त्यांना मदत करावी अशी मागणी उत्पादक शेतकरी वर्गातून होत आहे.

 

लग्नसराई आदी कार्यक्रमास फुलांची मागणी जास्त असते. त्यामुळे हे सर्व लक्षात घेता या फुलांची लागवड केली होती, मात्र कोरोनामुळे केलेली मेहनत व पैसा वाया गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
- बब्रुवान कंकाळ, खडकुत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Causes Loss Rose Farming, Nanded News