Video - कोरोना इफेक्ट : नांदेड जिल्ह्यातील बॅट विक्रेत्यांची वाढली चिंता

प्रमोद चौधरी
Saturday, 29 August 2020

नांदेड शहरामध्ये स्थानिक कारागिरांसह इतर राज्यांतूनही आलेले कारागीर फुटपाथवर बसून बॅट विक्री करतात. मात्र, यंदा लाॅकडाउनमुळे व्यवसाय झाला नसल्याने त्यांची चिंता आता वाढली आहे.

नांदेड : उज्ज्वल भविष्याच्या आशेने गुजरात, हैद्राबाद आदी राज्यांतील काही कारागीर मुलाबाळांसह नांदेडमध्ये आले. चांगली कमाई होईल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, कोरोनाने त्यांच्या संपूर्ण आशेवर पाणी फेरले. लॉकडाउन काळात एका पैशाचीही कमाई न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, आपल्या भविष्याबद्दल हे कारागीर चिंतित आहेत. 

हैद्राबाद येथील सागर मंचोरीया २० वर्षांपूर्वी व्यवसायाच्या उद्देशाने परिवारासह नांदेडमध्ये आलेले आहेत. त्यांच्यासोबत इतरही १०-१५ परिवारांतील सदस्य आहेत. तेव्हापासून हे सर्व जण आयटीआय चौक, कलामंदिर, जुना मोंढ्यासह शहरात इतरही ठिकाणी फुटपाथवर लाकडी क्रिकेट बॅट, स्टम्स, बेल्स, स्टडी टेबल्स विक्रीचा व्यवसाय करतात. दिवसरात्र मेहनत करून बॅट व इतर साहित्य त्यांना बनवावे लागते. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. वर्षभर बऱ्यापैकी कमाई होते. उन्हाळ्यातील दोन-तीन महिने सर्वाधिक कमाईचे असतात. परंतु, कोरोनामुळे लॉकडाउन लागल्याने मुले घराबाहेर पडलेच नाही. शिवाय या वेळी उन्हाळी क्रिकेट शिबिरेही बंद होती. त्याचा बॅट विक्रिवर परिणाम झाला आहे.  

हेही वाचा - नांदेडला शुक्रवारी २१५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर, पाच जणांचा मृत्यू
 
गुजरात येथील श्रीधरराव सातभाया सांगतात की, गत वर्षी याच काळात दिवसाला दोन ते तीन हजारांची विक्री होत होती. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे या दिवसांमध्ये तशीही कमाई कमीच असते. त्यांनी जवळच्या जमापुंजीच्या भरवशावर कसेबसे दिवस काढलेत. शिवाय सामाजिक संस्थांनी दिलेल्या जेवण व अन्नधान्याचीही थोडीफार मदत झाली. मात्र, आता एकेक दिवस कठीण जात आहे. ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिवसभर ताटकळत बसावे लागत असल्याची खंतही सातभाया यांनी व्यक्त केली.    

हे देखील वाचलेच पाहिजे - नांदेड - प्रवेश घ्यायचा असेलतर विनाअनुदानित अभ्यासक्रमासाठी घ्या, महाविद्यालयांची शक्कल

स्थानिक कारागिरही चिंतेत
शहरामध्ये बॅट बनविणारे स्थानिक गारागिरही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यापैकीच एक असलेले गंगाधर गायकवाड. आंबेडकरनगर येथे ते कुटुंबियांसमवेत राहतात. बॅट बनवून विकायचे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण चालते. परंतु, लाॅकडाउनमुळे बॅट विक्रीचा पूर्ण सिझन वाया गेला असून, मुलांचे शिक्षण तसेच कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा, अशी चिंता त्यांना आता भेडसावत आहे. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असल्याने मुले बाहेर पडत नाहीत. परिणामी खेळांची मैदानेही ओस पडलेली आहेत. त्यामुळे आता आमच्या भविष्याची चिंता सतावत असल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले.  

येथे क्लिक कराच - रुग्ण वाढल्याने तपासणीसह  कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष...कुठे ते वाचा

कच्चा माल विकत घेऊन घरीच दिवसरात्र घाम गाळून चौदा वर्षांपासून बॅट बनवित आहे. त्यावच उदरनिर्वाह तसेच मुलांचे शिक्षण अवलंबून आहे. मात्र, लॉकडाउनमुळे काहीच कमाई झाली नाही. भविष्य अंधकारमय दिसत असल्याने मुलांच्या शिक्षणाची चिंता आहे. 
- गंगाधर गायकवाड, आंबेडकरनगर नांदेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona effect Increased Concern Among Bat Sellers Nanded News