कोरोना इफेक्ट : आठवडे बाजाराचे महत्त्व होतेय कमी 

File photo
File photo

नांदेड : मार्च महिन्यात कोरोनाचे लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरायला सुरुवात झाल्याने शासनाला कडक लाॅकडाउन करावे लागले. त्यामुळे आठवडी बाजारावरही संक्रांत आली. काही दिवसतर अत्यावश्यक वस्तू विकण्याचीच परवानगी राहिल्याने किराणा व भाजीपाला हा गावोगावी तेथेच विकल्या जाऊ लागला. पाहता पाहता प्रत्येक खेडेगावात छोटे मोठे बाजार भरू लागले व हीच परंपरा सुरु राहिल्याने लाॅकडाउन उठला व आठवडी बाजार पुन्हा सुरु झाला; तरी गावातच सर्व भेटते म्हणून आठवडी बाजाराकडे जाण्याची जनतेची मानसिकताच कमी झाली. 

अगोदर आठवड्यातून एकदा शहरात किंवा एखाद्या मोठ्या गावात आठवडी बाजार असला म्हणजे परिसरातील सर्व गावांची मंडळी भाजीपाला, किराणा एवढेच काय कपडालत्ताही खरेदी करायला जात होती. आतापर्यंत हे सर्व सुरळीत सुरु होते. गर्दी नको म्हणून अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आपले धंदे गावाच्या बाहेर रस्त्यावर सुरु केल्याने ती एक रस्त्यावरची क्रेझ सगळीकडेच रुजू झाली आहे. 

आठवड्यातून ठरवून दिलेला वार म्हणजे त्या दिवशी बाजार असं काहीसं चित्र गेल्या अनेक वर्षांपासून आठवडी बाजाराचं दिसून यायचं. शक्यतो हे बाजारही शहरात किंवा मोठ्या गावात भरत असल्याने त्या दिवशी आठवड्यातून एकदा घरात लागणाऱ्या सर्व वस्तू विकत आणण्यासाठी खेड्यापाड्यातील जनता बाजार करायला होईल त्या वाहनाने जायची. त्यामुळे बाजारही फुलून जायचा. हे चित्र आतापर्यंत सुरु राहिले. 

परंतु यावर्षी संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढवल्याने महाराष्ट्रातील जनतेलाही त्याच्या झळा सोसाव्या लागल्या. परिणामी कडक लाॅकडाउनचे पालन सर्वांना करावे लागल्याने आठवडी बाजार संकटात सापडले आहेत. मोठमोठे उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांची उमासमारी झाली. पर्यायाने गावागावात उद्योगाची पर्वणी उदयास येवून छोटे मोठे धंदे सुरु झाले व त्यातूनच गावागावात भाजीपाला व फेरीचे धंदे सुरु झाले. 

रस्त्यांवर भाजीपाला, फळे व कपडेही 
कोरोनाने सर्वांना रस्त्यावर आणल्याने गावातील सोशल डिस्टन्सला बाधा पोहचू नये म्हणून गावबाहेरच्या रस्त्यावर बाजार भरण्याची क्रेझ सध्या निर्माण झाली. भाजीपाला रस्त्यावर एवढेच काय कपडे, फरसाण व इतर वस्तूही रस्त्यावर मिळत असल्याने आठवडी बाजाराचे महत्त्व कमी झाल्याचे दिसत आहे. 
- रामेश्वर अप्पा वाळेकर (व्यावसायिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com