कोरोना संकट : मृत्यूनंतर अंत्यविधीची जबाबदारीही प्रशासनाच्या खांद्यावर, कुठे गेली माणूसकी?

प्रल्हाद कांबळे
Friday, 7 August 2020

कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास नातेवाईकसुद्धा त्याच्या अंत्यविधीला समोर येत नसल्याने शेवटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्या मयतावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे

नांदेड : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून त्याच गतीने मृत्यूंचीही संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास नातेवाईकसुद्धा त्याच्या अंत्यविधीला समोर येत नसल्याने शेवटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्या मयतावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. एकीकडे अधिकाऱ्यांच्या सामाजिक दायित्वाची चोहीकडे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे कुठे गेली माणूसकी असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. पुन्हा एकदा मुखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय चव्हाण यांच्या कृतीतून दाखवून दिले.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या जवळपास तीन हजारवर पोहोचली असून मृत्यूचा आकडाही शंभरच्या वर गेला आहे. मयत रुग्णांच्या नातेवाईकांना विनंती केल्यानंतरही काही नातेवाईक अंत्यविधीसाठी समोर येत नसल्याचे धक्कादायक चित्र जिल्ह्यात मागील काही  घटनांवरून पहावयास मिळत आहे. विष्णुनगर भागात मृत पावलेल्या एका बाधित रुग्णाच्या अंत्यविधीसाठी त्याच्या घरची मंडळी कोरोना बाधित असल्याने क्वारंटाईन असल्याने त्या मयतावर पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी अंत्यसंस्कार केले.

हेही वाचा -  पोलिसांसाठी गुड न्यूज : बदल्यांचा मुहूर्त स्वातंत्र्य दिनापर्यंत, फिल्डींगसाठी एक आठवडा

नांदेड शहरातही घडली होती अशी घटना

तसेच अबचलनगर परिसरात कोरोनाने मृत्यू पावलेल्या एका रुग्णांवर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने त्याच परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी पुढाकार घेऊन अंत्यविधी केला. तर शहरातील जवळपास २० रुग्णावर विविध स्मशानभूमीत हॅपी क्लबच्यावतीने अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. आपला माणूस, आपले नातेवाईक या घटनांपासून दूर जात आहेत. कोरोनाची भीती मनात ठासून भरल्याने काही जण मयताचे दर्शनसुद्धा घेण्यास मागेपुढे पाहत आहेत.

उमरीतही मुख्याधिकाऱ्यांना द्यावा लागला खांदा

उमरी शहरात दोन दिवसांपूर्वीच एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. परंतु तिला एकच मुलगी असल्याने अस्थीला खांदा देण्यासाठी पुरुष मंडळी कोणीच नव्हती. नातेवाईक कोणीच नसल्याने व ती कोरोना बाधित नसतानाही तिची अंत्यविधी करण्यास शेजारी किंवा समाजातील कोणीही व्यक्ती पुढे येत नव्हते. अखेर मयत वृद्धेची मुलगी अंगणवाडी सेविका हिने नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री डोईफोडे यांना विनंती केली. शेवटी श्री. डोईफोडे यांनी स्वच्छता कर्मचारी यांना सोबत घेऊन मृत महिलेवर अंत्यसंस्कार केले.

येेथे क्लिक करानांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पात झाला एवढा पाणीसाठा

मुख्याधिकारी विजय चव्हाण यांचा पुढाकार 

ही घटना ताजी असतानाच गुरुवारी (ता. सहा) मुखेड येथील एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला. त्यानंतरही त्या मृताच्या नातेवाइकांनी मृतदेहाजवळ येणे तर सोडाच, अंत्यसंस्कार करण्याची ही माणुसकी दाखविली नाही. शेवटी मुखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय चव्हाण यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आपले सहकारी नायब तहसिलदार श्री. हांडे, शेख अमीर, श्री. कुचेवाड आणि श्री. शेंडगे यांनी अंत्यसंस्काराच्या साहित्याची जमवाजमव केली. सायंकाळी अंत्यसंस्कार करुन समाजात पुन्हा एकदा अधिकाऱ्यांनी मामुसकीचा झरा वाहता ठेवला. परंतु अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर भविष्यात अधिकाऱ्यांवर ताण येणार असून त्यांचीही मानसिकता राहणार नाही. त्यासाठी समाजातील सुज्ज्ञ नागरिकांनी या संस्कारासाठी पुढे यावे असे आवाहन विजय चव्हाण यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona : The responsibility of funeral after death also falls on the shoulders of the administration, where has humanity gone nanded news