कोरोना यौध्यांना गौरविणाऱ्यांनाच कोरोनाने हेरले, एकाच कुटुंबातील १३ जण बाधीत 

प्रल्हाद हिवराळे
Sunday, 26 July 2020

उमरी शहरात एकच खळबळ उडाली. उमरी शहरात कोरोनाचा झालेला शिरकाव अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरत आहे.  या दानशूर कुटुंबातील तेरा जणांनाच कोरोनाने घेरल्याने उमरीकरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

उमरी (जिल्हा नांदेड) : कोरोनाला हरविण्यासाठी शहरातील कोरोना यौध्यांना अकरा लाखांचे बक्षीस देणाऱ्या व त्यांच्या पाठीवर थाप टाकणाऱ्या एका व्यापाऱ्यासह त्याच्या कुटुंबाला हेरले. यामुळे उमरी शहरात एकच खळबळ उडाली. उमरी शहरात कोरोनाचा झालेला शिरकाव अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरत आहे.  या दानशूर कुटुंबातील तेरा जणांनाच कोरोनाने घेरल्याने उमरीकरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

उमरी शहरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून कोरोना बंदोबस्त करणाऱ्या यौद्ध्यांना ११ लाखाचे बक्षीस देणाऱ्या या दानशूर व्यक्तीच्याच कुटुंबात शिरकाव केला असून त्यांच्या कुटुंबातील सुमारे १३ जणांना कोरोनाने हेरले आहे. सर्वसामान्य लोकांचे हित जोपासणारा आणि कोरोना यौद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना ११ लाख रुपयांचे बक्षीस देणाऱ्या दानशूर व्यक्तीलाच कोरोना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. परंतु सध्या सर्वांची प्रकृती ठीक आहे.

माजी नगराध्यक्ष विजयकुमार उत्तरवार यांनी ११ लाख रुपये दिले होते

उमरी शहर व तालुक्यात पहिल्याच लॅाकडाऊनच्या काळात कोरोना लढाईसाठी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून ना पाणी, ना भूक याची तमा न बाळगता ज्या विभागाने जनसेवा केली. अशा आरोग्य कर्मचारी, नगरपालिका, पोलीस, सफाई कामगार, महसूल विभागातील कर्मचार्‍यांना बक्षीस म्हणून उमरीचे सराफा व्यापारी माजी नगराध्यक्ष विजयकुमार उत्तरवार यांनी ११ लाख रुपये दिले होते. एवढे मोठे बक्षीस कोरोना यौध्यांना देणारे ते कदाचित जिल्ह्यातील पहिले दानशूर असावेत. तेव्हापासून ते पाचव्या लाॅकडाउनपर्यंत कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन, तहसील, पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त केला. 

हेही वाचा - जिल्हा परिषदेतील अखेर बदल्यांना ब्रेक, अनेकांच्या अपेक्षा भंग

उमरी केअर सेंटरमध्ये उपचार सुरु

जिल्हाधिकाऱ्यांनी पाचव्या लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने हळूहळू लोक अत्यंत आवश्यक वस्तूंच्या खरेदीचा बहाणा करीत घराबाहेर पडू लागले. त्यामुळे पोलिस यंत्रणेसह सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून सतत प्रयत्न करत आहेत. मात्र जनताही चतुराई दाखवत लग्नसमारंभ किंवा आजाराचे निमित्त करून पास काढून सोयरे- धायरे भेटीगाठी करुन ये-जा करीत होते. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शहरातील सर्वात सुरक्षित कुटुंब गणल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठित कुटुंबातील एका महिलेला ताप आल्याचे निमित्त झाले. त्यानंतर सर्वांनीच कोरोना चाचणी करून घेतली त्यामुळे तब्बल १३ जण कोरोना बाधित निघाले. त्यातील काही जणांना उमरी केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असून चार जणांना औरंगाबादला दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कातील एक चालक शनिवारी (ता. २५) बाधित निघाला. या घटनेमुळे उमरीकरांमध्ये मात्र चांगलीच घबराट पसरली आहे. 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona saw only those who glorified the Corona warriors, 13 members of the same family were affected nanded news