esakal | कोरोना : दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण नांदेड जिल्ह्यात सुरु

बोलून बातमी शोधा

file photo}

जिल्ह्यातील अनेक शासकीय रुग्णालय तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना जोडलेल्या खाजगी रुग्णालयात लसीकरणाचा कार्यक्रम घेता आला नाही.

कोरोना : दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण नांदेड जिल्ह्यात सुरु
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सोमवारी (ता. एक मार्च) रोजी नांदेड जिल्ह्यात प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी केवळ १४ जणांना लस देण्यात आली. या लसीकरणासाठी नोंदणी करणाऱ्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शासकीय रुग्णालय तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना जोडलेल्या खाजगी रुग्णालयात लसीकरणाचा कार्यक्रम घेता आला नाही.

जिल्हाधिकारी डॉ. विपिन हे आज मंगळवारी (ता. दोन) दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेऊन गती देणार आहेत. कोरोना प्रादुर्भाव कमी करुन नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात फ्रंट वर्कर (कोरोना वारियर्स) आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना कोवीडची लस देण्याचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. त्यानंतर सोमवारपासून (एक मार्च) दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा असे आजार असणाऱ्या 45 ते 60 वयोगटातील रुग्णांना तसेच 60 वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांना दुसऱ्या टप्प्यात शासकीय रुग्णालयात मोफत लस दिली जाणार आहे.

हेही वाचा - विधायक बातमी : उपक्रमशील शिक्षिका शितल मापारी यांचे योगदान

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जोडलेल्या रुग्णालयातही ही लस दिली जाईल. जिल्ह्यात कोविशिल्ड कोरोना प्रतिबंधक लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी विपीन यांनी सांगितले. नांदेड शहरातील महानगरपालिकेच्या हैदरबाग रुग्णालयात, जिल्हा सामान्य रुग्णालय महापालिकेसमोर, शासकीय आयुर्वेद रुग्णालय तसेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लस देण्याचा कार्यक्रम सुरु आहे. या शिवाय जिल्ह्यातील काही निवडक शासकीय उपजिल्हा रुग्णालयातही लस दिली जात आहे.

या लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित नागरिकांना आरोग्य सेतू ॲप किंवा Covid.gov.in (कोविड डॉट जीओव्ही डॉट इन) या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी करताना संबंधितांचा मोबाईल क्रमांक नोंदविल्यानंतर ओटीपी प्राप्त होईल. त्या आधारे स्वतःचे नाव, वय, लिंग आणि आधार कार्डच्या इतर कागदपत्रे अपलोड करावे लागतील. 45 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना डॉक्टरांनी दिलेले वयाचे प्रमाणपत्र जोडावे लागेल. ज्या ठिकाणी लस घेण्याची इच्छा आहे त्या केंद्राचे नाव तसेच तारीख नमूद करावी. नोंदणी करणाऱ्यांना जास्तीत जास्त चार केंद्राचा लसीकरण पर्याय उपलब्ध राहणार आहे.ज्येष्ठ नागरिकांना सेतू सुविधा केंद्रामार्फत लसीकरणासाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय १५०७ या क्रमांकावर दूरध्वनी करुन आपल्या लसीकरणाबाबत अधिक माहिती मिळवता येईल.