
जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे
नांदेड : कोरोना महामारीतून रुग्णांना वाचविण्यासाठी शासनस्तरावरुन जी यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली, ज्या उपाययोजना करण्यासाठी निधी वितरीत करण्यात आला, पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नियोजनाखाली करण्यात आलेल्या यंत्रसामुग्री खरेदी आणि निधी वितरणात प्रचंड गैरव्यवहार झाला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माणिक लोहगावे यांनी केले आहे. यासाठी आपण राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही लोहगावे यांनी सांगितले.
देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर या महामारीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. मात्र नांदेड जिल्ह्यात या निधीत प्रचंड गैरव्यवहार करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2020-21 अंतर्गत कोविड-19 अंतर्गत तब्बल 27 कोटी 62 लाख निधीचे प्रयोजन करण्यात आले होते. त्यातील 20 कोटी 63 लाख रूपये वितरीत करण्यात आले. मात्र या निधीतून जी कामे करण्यात आली ती कामे अत्यंत निकृष्ट, दर्जाहीन करण्यात आली आहेत. व्हेंटीलेटर, मास्क, पीपीई किट, सॅनिटायझर खरेदीमध्ये बाजारभावापेक्षा चढ्याभावाने खरेदी झाल्याचे दिसून येते.
अँटीजन किटची खाजगी बाजारातील किंमत 250 रुपये असताना शासकीय खरेदीत ही किंमत चक्क 500 रुपयांपर्यंत पोहोचविण्यात आली. कोविड-19 च्या उपाययोजना करण्यासाठी नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्ह्यातील देगलूर, हदगाव, मुखेड, किनवटसह उपजिल्हा रुग्णालयांतही साहित्य खरेदीसाठी करण्यात आलेल्या व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. कोरोना वार्डाची, स्वच्छतागृहाची, विद्युतीकरणाची, वॉटरप्रूफ शेड उभारणी, कॉट खरेदी, फिटीएम किट आदींतही प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आला आहे.
कोविड निधीतून रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीची दुरुस्ती करणे, इमारतीची दुरुस्ती करणे, इलेक्ट्रिशियनची कामे करणे आदी कामांसाठी जो निधी खर्च झाला त्या निधीत गैरव्यवहार झाला आहे. एवढेच नाही तर नव्याने बांधलेल्या शासकीय जिल्हा रुग्णालयातील नव्या व्हेंटीलेटर देखभाल दुरुस्तीसाठीही करोडो रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला असल्याने नव्याने खरेदी केलेल्या व्हेंटीलेटरची दुरुस्ती कशासाठी, असा सवालही जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजपचे जि. प. सदस्य माणिक लोहगावे यांनी उपस्थित केला आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले, नांदेडसह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटरची सुविधा उपलब्ध असतानाही ग्रामीण भागातील रुग्णांना नांदेड येथे हलविण्यात येत होते. त्यामुळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयावरील वाढलेला ताण आणि कमी पडलेल्या उपाययोजना यामुळे रुग्णांचे प्राण गेले. रुग्णांचे प्राण जाण्यास कारणीभूत ठरलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, कोरोना निधीत झालेल्या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, यासाठी आपण राज्यपाल भगतसिंह कोशीयार यांची भेट घेणार असल्याचेही लोहगावे म्हणाले.