कोरोना अपटेड - नांदेडला दोन रुग्णांची भर; चारजण कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

नांदेडला रविवारी (ता. २८ जून) सायंकाळपर्यंत दोन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६७ झाली आहे. तसेच रविवारी चार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

नांदेड - नांदेडला शनिवारी (ता. २७) रात्री आलेल्या अहवालात १६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रविवारी (ता. २८) सायंकाळपर्यंत दोन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६७ झाली आहे. तसेच चार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नांदेडचे कॉँग्रेसचे आमदार व त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात कार्डियाक रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात आले आहे.

नांदेडला शनिवारी तब्बल १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर रविवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजेपर्यंत आणखी दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता रुग्णांची संख्या ३६७ झाली आहे. नांदेड शहरातील आंबेडकर नगर येथील ५५ वर्षीय पुरुष तसेच लोहा गॅस गोडावूनजवळील एक ३१ वर्षांचा पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा - आरोग्य सभापतीकडून कोरोना वॉरिअर्सचा सन्मान - कुठे ते वाचा 

आमदारांसह तीनजण औरंगाबादला रवाना
दरम्यान, शनिवारी नांदेडचे कॉँग्रेसचे आमदार व त्यांच्या कुटुंबातील नऊ सदस्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. माजी महापौर आणि त्यांचा मुलगा नगरसेवक या दोघांच्या संपर्कात आल्याने आमदार कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी (ता. २८) आमदार आणि त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

७२ जणांवर उपचार सुरू
एकूण ३६७ रुग्णांपैकी १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर २७९ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. उर्वरित ७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी विष्णुपुरीच्या शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १६ रुग्ण, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४६ रुग्ण, मुखेड कोविड केअर सेंटर येथे एक, देगलूर कोविड केअर सेंटर येथे एक रुग्ण उपचार घेत आहे. त्याचबरोबर सात रुग्ण औरंगाबादला, तर एक रुग्ण सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत.

हेही वाचलेच पाहिजे - कॉंग्रेसचे ते आमदार कुटुंबियांसह उपचारासाठी औरंगाबादला 

सहा रुग्णांची प्रकृती गंभीर
७२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी दोन महिला (वय ५० व ५५) आणि चार पुरुष (वय ३८, ४२, ६७ आणि ७५) यांचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी (ता. २८) ७४ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल सोमवारी (ता. २९) सायंकाळपर्यंत प्राप्त होतील.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत माहिती

 • आतापर्यंत एकूण संशयित - ६१६६
 • एकूण क्वारंटाइन व्यक्तींची संख्या - ५७०८
 • क्वारंटाइन कालावधी पूर्ण - ३४१२
 • अजून निरीक्षणाखाली असलेले - १६३
 • त्यापैकी दवाखान्यात क्वारंटाइनमध्ये - ४३
 • घरीच क्वारंटाइनमध्ये असलेले - ५६६५
 • आज घेतलेले नमुने - ७३
 • एकूण नमुने तपासणी - ६२०६
 • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - ३६७ (त्यापैकी चार संदर्भित आलेले आहेत)
 • त्यापैकी निगेटिव्ह - ५३९० - नमुने तपासणी अहवाल बाकी - ७४
 • नाकारण्यात आलेले नमुने - ९४
 • अनिर्णित अहवाल - २७६
 • कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - २७९
 • कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या - १६
 • जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी एक लाख ४६ हजार ५८३ असून त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Updated - Two patients added to Nanded; Four coronal free, Nanded news