esakal | कोरोनाची करणी...खरिपाची कशी होईल पेरणी
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

पीक घरात पडून असताना त्यांना योग्य भाव मिळत नसल्याने आगामी बी-बियाण्याच्या चिंता शेतकऱ्यांना सतावत असून कोरोनाच्या या करणीत शेतकऱ्यांच्या पेरणीवर विपरीत परिणाम जाणवणार असे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

कोरोनाची करणी...खरिपाची कशी होईल पेरणी

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवर पडलेला ताण आता इतरही क्षेत्रावर आपली संकटरुपी छाया गडद करीत आहे. कोरोनामुळे व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले असताना अवघ्या महिन्याभरावर आलेल्या खरिप पेरणीवरही कोरोनाचे सावट पसरल्याचे दिसत आहे.

सध्या लाॅकडाउन असल्यामुळे शेतीसंबंधित अनेक कामात बाधा पोहचत असल्यामुळे व मजुरांची टंचाई भासत असल्याने शेवटच्या टप्प्यातील शेतीची कामे खोळंबली आहे. पीक घरात पडून असताना त्यांना योग्य भाव मिळत नसल्याने आगामी बी-बियाण्याच्या चिंता शेतकऱ्यांना सतावत असून कोरोनाच्या या करणीत शेतकऱ्यांच्या पेरणीवर विपरीत परिणाम जाणवणार असे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. 

शेतकऱ्यांमध्ये चिंता
संचारबंदीमुळे शेतीची मशागतीची अनेक कामे अडकली आहेत. ट्रॅक्टरद्वारे शेती मशागतीस शेतकरी पसंती देत असल्याने डिझेल मिळण्याच्या झंझटीमुळे अनेक ट्रॅक्टरही जागेवर उभे आहेत. इतरही अनेक अडचणी शेतकऱ्यांना येत असून सध्या रब्बीच्या मका सोंगणी व फरदडच्या कापूस वेचणीचा हंगाम असताना यासाठी मजूर मिळत नसल्याने जवळच येऊन ठेपलेल्या खरिपाच्या पेरणीपर्यंत शेतीची कामे होतील की नाही ही चिंता शेतकऱ्यास सतावत आहे.

 शेतकरी पुन्हा संकटात
सध्या लाॅकडाउनमुळे खासगी व्यापारी शेतमाल घेण्यास मागेपुढे पाहत असल्याने शेतमालाच्या भावात अत्यंत घसरण झाली आहे. दुसरीकडे गतवर्षीच्या मुबलक पावसामुळे पाणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली होती. यात टरबुज, खरबुज, काकडी, टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकांचा समावेश होता. पण ऐन पिक पदरात पडतानाच कोरोनाच्या संचारबंदीमुळे लाखमोलाची पिके कवडीमोल दरात विकावी लागली. परिणामी खर्चही निघाला नसल्याने शेतकरी पुन्हा संकटाच्या खाईत लोटला गेला आहे.

अन कर्जमाफीही लांबली
कोरोनाने जगातील प्रत्येक घटकाचे आपल्या उद्रेकाने नुकसान केले . पण यात शेतकरी मात्र पुरता कोलमडल्याचे दिसत आहे. लाखाचे पीक रुपयात तर रुपयांचे पीक रस्त्यावर फेकावे लागल्याचे चित्र असून कर्जमाफी अजूनही हवेतच फिरत असताना कर्जमाफी होऊन नवीन कर्ज मिळेल ही अपेक्षाही आता लांबली आहे.
- मुरलीधर गोरे (शेतकरी, वाडी)