नांदेडला कोरोनाचा धक्का अन् दिलासाही...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

नांदेडला बुधवारी (ता.२०) १४ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी दहा निगेटिव्ह तर चार संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये भोकर व मुखेड येथील प्रत्येकी एका पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.

नांदेड - काही दिवसापूर्वी ग्रामिण भागात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. परंतु माहूर आणि त्या पाठोपाठ बारड येथे अचानक दोन कोरोना रुग्ण आढळून आल्यापासून शहरासह जिल्ह्यात कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली. मंगळवारी (ता.१९) मध्यरात्री आठ आणि बुधवारी (ता.२०) सायंकाळी सातच्या दरम्यान पुन्हा चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने दोन दिवसातच जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९८ वरुन ११० वर पोहचली आहे. 

नांदेडला बुधवारी (ता.२०) १४ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी दहा निगेटिव्ह तर चार संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये भोकर व मुखेड येथील प्रत्येकी एका पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच नांदेड शहरातील स्नेहनगर पोलिस कॉलनीतील व सांगवीचा प्रत्येकी एक रूग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. त्यामुळे आता जिल्ह्यात अजून तीन कंटेंटमेंट झोनची वाढ होणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

हेही वाचा- लॉकडाउन : ‘या’ विभागाची शंभर कोटींची उलाढाल- लिंगायत

पुन्हा चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

दरम्यान, बुधवारी (ता.२०) पंजाब भवन येथे उपचार सुरू असलेल्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सहा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने कोरोनाच्या कचाट्यातून सुटका झालेल्या या सहा रुग्णांना बुधवारी (ता. २०) जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या उपस्थितीत घरी सोडण्यात आले. या बातमीनंतर काही तासाच्या आतच पुन्हा चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.  

एकीकडे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढत होत असताना दुसरीकडे कोरोना या जीवघेण्या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनास दिलासा मिळत असताना तितकेच मोठे धक्के बसत आहेत. मंगळवारी (ता. १९) सकाळी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर पुन्हा प्रलंबित अहवालांपैकी रात्री उशिराने १३७ नमुने अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२४ रिपोर्ट निगेटिव्ह, तर आठ रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि इतर पाच रुग्णांचे अहवाल अनिर्णित अवस्थेत आले आहेत. 

हेही वाचा- नांदेडच्या ‘या’ कार्यकर्त्याला उपराष्ट्रपतींचा फोन...? काय म्हणाले वाचा

चार वर्षांच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह

मंगळवारी रात्री उशिराने प्राप्त झालेल्या अहवालांपैकी पाच पुरुष व तीन महिलांचा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे. यापैकी सहाजण कुंभार टेकडी, एक करबलानगर, एक पॉझिटिव्ह रुग्ण अबचलनगर भागातील असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये चार वर्षांच्या एका मुलाचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

६७ रुग्णांवर औषधोपचार सुरू
जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९८ वरून ११० वर पोचली आहे, तर आतापर्यंत ३६ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अद्यापही फरारच आहेत. सध्या ६७ रुग्णांवर औषधोपचार सुरू असून नव्याने ३१ संशयितांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. तर यापूर्वीचे ४६, असे ७७ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्री. भोसीकर यांनी दिली.   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's Push To Nanded Is Heartbreaking Nanded News