फुलवळ ग्राम पंचायतमध्ये सरपंच, ग्रामविकास यांच्या संगनमताने लाखोंचा भ्रष्टाचार

धोंडीबा बोरगावे
Wednesday, 3 March 2021

प्रवीण मंगनाळे यांनी लेखी तक्रार देऊन चौकशीची केली रीतसर मागणी.

फुलवळ ( ता. कंधार, जिल्हा नांदेड ) : कंधार तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे आणि जवळपास सहा हजार लोकसंख्या असलेले तसेच राजकीय घडामोडीत अतिशय चाणाक्ष म्हणून परिचित असलेले फुलवळ हे गाव तसे चांगले. परंतु अनेक समस्यांनी गंजले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यातच सण २०१५ ते २०२० या कालावधीत तत्कालीन सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी पदाचा गैरवापर करत संगनमत करून शासनाच्या विविध योजनांचा बोजवारा उडवत गावकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची लेखी तक्रार येथीलच प्रवीण मंगनाळे यांनी गटविकास अधिकारी पं. स. कंधार यांच्याकडे मंगळवारी ( ता. दोन) मार्च रोजी केली असून सदर भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी ही त्यांनी त्या तक्रारी निवेदनात केली आहे.

फुलवळ हे गाव मुख्य रस्त्यावर असून जि. प. गटाचे गाव असल्याकारणाने येथे तशी नेहमीच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यरत असलेले लोकप्रतिनिधी तसेच त्या त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या भेटी गाठी असतातच त्यामुळे येथे प्रत्येक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने आहेत, वेळोवेळी ग्राम पंचायतच्या हालचाली, कार्यपद्धती व विकासकामे, प्राप्त शासन निधी तसेच होत असलेला भ्रष्टाचार या सर्व बाबीकडे ग्रामस्थांचे नेहमीच बारकाईने लक्ष असतेच. असे असतानाही गतकालीन ग्राम पंचायत च्या कारभारात विविध कामात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत असल्याने अशा बाबींची संबंधिततांनी तात्काळ चौकशी करावी यासाठी तक्रारी निवेदन दिले असल्याने आता गटविकास अधिकारी काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिलेल्या तक्रारी निवेदनात येथील स्मशानभूमीचे सुशोभीकरण, पशुवैद्यकीय दवाखाना, हातपंप, विजपंप, पाणीपुरवठा दुरुस्ती व नवीन पाणीपुरवठा योजना, कचरा संकलन, शाळेसाठी सौर ऊर्जा बसवणे आदी कामात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून अंदाजे दहा लाख ९६ हजार पाचशे अकरा रुपये एवढ्या मोठ्या रक्कमेचा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार देऊन संबंधित कामे आणि भ्रष्टाचार करणारे जे असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई वरिष्ठ अधिकारी करतील का ? याकडे तक्रारदार सह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corruption of lakhs in Phulwal Gram Panchayat with the connivance of Sarpanch and Gram Vikas nanded news