धर्माबाद शहरातील कोविड सेंटर बंद, पॉझिटिव्ह रुग्ण बिलोलीला रेफर

सुरेश घाळे
Tuesday, 3 November 2020

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असतांना चार महिने कोरोनाला रोखण्यात धर्माबाद प्रशासनाला यश आले.

धर्माबाद (नांदेड ) : शहर व तालुक्यात एकूण ५९९ कोरोना बाधितांची नोंद झाली असून आतापर्यंत ५९२ जण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या धर्माबादेतील कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात हे केंद्र बंद करण्यात आले असून यापुढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बिलोली येथे रेफर करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूमुळे (ता.२२) मार्चपासून देश लॉकडाउन झाला. नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असतांना चार महिने कोरोनाला रोखण्यात धर्माबाद प्रशासनाला यश आले. शहर व तालुक्यात ११ जुलैपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. अखेर कोरोनाने धर्माबादेत एन्ट्री केली. शहरातील एक पोलिस अधिकारी (ता.१२) जुलै रोजी कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. व तालुक्यातील माष्टी या गावातील नागरिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. तेंव्हापासून शहर व तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. 

दरम्यान संसर्ग रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेळके यांनी सातत्याने बैठका घेऊन आदेश दिले. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. शहर व तालुक्यात आजपर्यंत ४६३ जणांचे स्वॅब टेस्ट करण्यात आले असून त्यापैकी ११३ जण पॉझिटिव्ह आले. तर एक हजार ६४९ जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी ४९२ जण कोरोनाबाधित आढळून आले. तालुक्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या ५९९ वर झाली आहे. त्यातील ५९२ जण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. विशेष म्हणजे येथील कोविड सेंटरमध्ये आजपर्यंत एकाचाही मृत्यू झाला नाही.

शहरातील माहेश्वरी भवन मधील कोविड सेंटरमध्ये सध्या एकही रुग्ण नाही, त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार (ता.२९) ऑक्टोंबर रोजी तात्पुरत्या स्वरूपात येथील कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेळके, पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दत्तात्रय शिंदे, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, मुख्याधिकारी श्रीमती नीलम कांबळे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगारे, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले, पोलिस उपनिरीक्षक गणेश कराड हे नेहमीच सज्ज होते. 

उद्योजक सुबोध काकाणी यांचे कौतुक

कोरोनाच्या संकटात उद्योजक सुबोध काकाणी यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून प्रशासन व कोरोनाबाधित तसेच गोरगरीब जनतेच्या संकटात मदतीला धावून आल्यामुळे त्यांच्या सामाजिक उपक्रमांची दखल प्रशासनानी घेतली होती. तसेच कोवीड सेंटरमधील कोरोनाबाधित रूग्णांना उद्योजक सुबोध काकाणी यांनी मोफत सकाळी नाश्ता, दुपारी व संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यामुळे उद्योजक सुबोध काकाणी यांचे कौतुक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले होते.  

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The covid center in Dharmabad has been temporarily closed due to non availability of patients