म्हणून मंगल कार्यालयावर केला गुन्हा दाखल

mangal karyalay.jpg
mangal karyalay.jpg


धर्माबाद, (जि. नांदेड)ः शहरातील गंगासीटी येथे आरक्षित जागेत अनधिकृत मंगल कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले. हे मंगल कार्यालय शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. या मंगल कार्यालयावर कारवाई करून सदरील बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणी सर्वस्तरातून जोर धरू लागल्याने गंगासीटीतील अनधिकृतरित्या बांधकाम केलेले मंगल कार्यालय सात दिवसात पाडण्याची अंतिम नोटीस मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी रामचंद्र देवल्ला कंदकुर्तीकर यांना दिली होती. परंतु गुरुवारी (ता.दोन) रोजी सदरील मंगल कार्यालयात एक विवाह सोहळा पार पडला आहे. आरक्षित जागेत विनापरवाना बांधकाम करून कार्यक्रमासाठी किरायाने देणे मंगल कार्यालय मालकास महाग पडले असून कंदकुर्तीकर यांच्यावर धर्माबाद पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा -  मांजरा नदीवर येसगीला ९७ कोटींचा नवीन पुल होणार

मंगल कार्यालयाची किंवा बांधकामाची कोणतीही परवानगी पालिकेकडून न घेता आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात गंगासीटी येथील उच्चभ्रू वस्तीत व्यावसायिक मंगल कार्यालयाचे बांधकाम करून प्रशासनाची खिल्ली उडवली. या वेळी अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. याप्रकरणी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दखल घेत (ता.११) डिसेंबर २०१९ व (ता.२७) जानेवारी २०२० रोजी सदरील अनाधिकृत बांधकामासंदर्भात नियमानुसार मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी कंदकुर्तीकर यांना पहिली नोटीस दिली. परंतु पालिकेने दिलेल्या नोटीसला कंदकुर्तीकर यांनी दुर्लक्ष करून धनशक्तीच्या जोरावर सदरील मंगल कार्यालयाचे बांधकाम पूर्ण केले. हे अनधिकृत मंगल कार्यालय पाडण्याची मागणी अनेकांनी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्याकडे केली होती. सदरील मंगल कार्यालय पाडण्याचा ठराव नगर पालिकेच्या २० सन्माननीय सदस्यांनी घेतला होता.

कारवाई कासवगतीने
गंगासीटी येथील मंगल कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने दुसरी नोटीस देऊन धडक कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. परंतु ही कारवाई गुलदस्त्यात राहिली. अनधिकृत मंगल कार्यालय पाडण्याचा ठराव घेऊन सहा महिने उलटले तरी अद्याप सदरील मंगल कार्यालय पाडण्यात आलेले नाही. त्यामुळे मंगल कार्यालय पाडण्याची मागणी मुख्याधिकारी देवरे यांच्याकडे पुन्हा जोर धरू लागली होती. त्यामुळे या मंगल कार्यालयावर कारवाई करण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या होत्या. परंतु दबाव आल्यानंतर ही कारवाई कासवगतीने सुरू होती. अशातच हे मंगल कार्यालय कोरोना पार्श्वभूमीवरही विवाह सोहळ्यासाठी किरायाने देत असल्याचे पालिका प्रशासनास समजले. 

न्यायालयाच्या निर्यणायाची अंमलबजावणी
कंदकुर्तीकर यांनी मी करोडो रुपये खर्च करून सदरील मंगल कार्यालयाचे बांधकाम पूर्ण केले असून मंगल कार्यालय पाडल्यावर माझे संसार उद्धवस्त होणार आहे. त्यामुळे आपण सदरील मंगल कार्यालय जागेसह विकत घेण्याची लेखी विनंती पत्र मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना दिले होते. सदरील लेखी पत्रासोबत कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई (ता.१५) जुलै पर्यंत करण्यात येऊ नये, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला असल्याच्या आदेशाची प्रत देण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्यणायाची अंमलबजावणी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी करीत असतांना गुरुवारी सदरील मंगल कार्यालयात एक विवाह सोहळा पार पडला आहे.


अनाधिकृत बांधकामप्रकरणी गुन्हा 
त्यामुळे कंदकुर्तीकर यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा गैरफायदा घेऊन शासनाचे महसूल बुडवून आपले उखळ पांढरे करुन घेत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे काही नगरसेवकांनी कंदकुर्तीकर यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्याकडे केली आहे. सदरील मागणीची दखल मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी घेऊन कंदकुर्तीकर यांच्यावर अनाधिकृत बांधकामप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी अभियंता सचिन सावंत यांना प्राधिकृत केले आहे. अभियंता सचिन सावंत यांनी गुरुवारी (ता.दोन) दुपारी कंदकुर्तीकर यांच्यावर अनाधिकृत बांधकामप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली आहे. सदरील दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com