नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली; आयजीनी लक्ष देण्याची गरज 

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्यातील सर्वात मोठे पोलिस ठाणे म्हणून पोलिस दलात परिचित असलेल्या नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरी, चारचाकी वाहनचोरी, जबरी चोरी तसेच घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असर्जन, विष्णूपुरी परिसरातील मुख्य रस्त्यावर धारदार चाकू, खंजर, तलवार व पिस्तूल आदी शस्त्राचा धाक दाखवून वाहन चालकांना लुटलेल्या अनेक घटनाही सद्यस्थितीत सहजासहजी विसरता येणाऱ्या नाहीत.

नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाडी- तांड्यासह तब्बल ४३ गाव आणि नांदेड ते हैद्राबाद, नांदेड ते लातूर व नांदेड ते बिदर या तीन राष्ट्रीय महामार्गांसह नवीन नांदेड परिसरातील ‘सिडको’वसाहत व ‘एमआयडीसी’परिक्षेत्र, श्री गुरु गोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, ‘सहयोग’सेवाभावी शिक्षण संस्था आणि कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा समावेश आहे.

दरम्यान, या परिसरात गत काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, सर्वसामान्य नागरिक व व्यापारी या परिसरातील गुन्हेगारांच्या मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत. अशा गुन्हेगारांविरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार दिली, तर उद्या गुन्हेगार आपल्याला स्वस्थ बसू देणार नाहीत, या भीतीपोटी कुणीही संबंधितांविरूध्द रितसर तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत, अशी जोरदार चर्चा नांदेडच्या सिडको-हडको परिसरासह नवीन नांदेड भागात सुरु आहे.

विशेष बाब म्हणजे, ग्रामीण ठाण्यातील पोलिस अधिकारी तथा संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांची या ठाण्याच्या हद्दीमधील गुन्हेगारांवर वचक राहिली नाही, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सिडको- हडको परिसरासह असर्जन, विष्णूपुरी, कौठा, जवाहरनगर, तुप्पा, वाजेगाव, शासकीय रुग्णालय व ‘एमआयडीसी’परिक्षेत्रात जबरी चोरी, दुचाकी वाहन चोरी, चोरी तसेच घरफोड्यांचे प्रमाण वाढते आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या ठाण्याच्या हद्दीत झालेल्या काही ‘दुचाकी’चोरीच्या तपासाशिवाय व अगदी बोटावर मोजण्या इतक्या अन्य गुन्ह्यांच्या तपासाव्यतिरिक्त ‘ग्रामीण’पोलिसांना गंभीर गुन्ह्याच्या तपासात यश मिळाले नसल्याने व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाऐवजी दोन स्वतंत्र विशेष गुन्हे शोध पथक कार्यरत असतानासुध्दा या ठाण्याच्या हद्दीत दुचाकी, चार चाकी चोरी, जबरी चोरी व घरफोड्यांचे प्रमाण वाढते आहे. त्याचवेळी, या ठाण्याच्या हद्दीत विविध प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे ग्रामीण पोलिस ठाण्यात अवैध धंदेचालकांविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या संख्येवरुनच सर्वांच्या निदर्शनास येते. या परिसरातील काही सामाजिक, राजकीय कार्यकर्ते आपल्या परिसरात अवैध धंदे सुरु असल्याची कल्पना ‘ग्रामीण’पोलिसांना दिली. मात्र, संबंधित पोलिसांकडून अशावेळेस वेळ मारुन नेण्याकरिता संबंधित अवैध धंदे चालकांविरुध्द थातुर- मातुर कारवाई करुन त्यांची मुक्तता करण्यात येते. परिणामी, या ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंदे चालकांविरुध्द कारवाई करा, किंवा त्यांचे अवैध धंदे बंद करा, असे म्हणण्याचे धाडसही दुसऱ्यांदा कुणी करत नाही, अशी सिडको व हडको वसाहतीसह नवीन नांदेड परिसरात चर्चा सुरु असल्याचेही समजते.

दस्तुरखुद्द पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी नांदेड ग्रामीण ठाण्याच्या ढिसाळ कारभाराकडे विशेष लक्ष देवून या परिसरातील सर्वसामान्य नागरिक व व्यापारी बांधवांमध्ये पसरत चाललेली चोरट्यांची दहशत दूर करून ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या चोरी तसेच वाढत्या घरफोड्यांचे प्रमाण कमी करण्याकरिता योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी व्यापारी बांधव तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com