
Nanded Crime News : किरकोळ कारणावरून पत्नीला जाळून मारणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा
बिलोली : किरकोळ कारणावरून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन तिला जिवंत मारणाऱ्या आरोपी पतीस सोमवारी (ता. २७) बिलोलीचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, नायगाव तालुक्यातील शेळगाव छत्री येथील आरोपी पिराजी माधव कुंभारगावे हा मयत कोमल पिराजी कुंभारगावे हिला ता. १९ जुलै २०१९ रोजी पहाटे पाच वाजता झोपेतून उठवून शिवीगाळ तसेच मारहाण करून शेताकडे निघून गेला. पुन्हा आठ वाजता शेताकडून घरी येऊन पत्नी उठली नसल्याचे कारण पुढे करून तिच्यावर रॉकेल ओतून पेटवून दिले.
त्यानंतर आगीचा भडका उडाला. त्यात कोमल जळाली. दरम्यान घरासमोरील शेजाऱ्यांनी धावून येऊन तिला नायगाव येथील रुग्णालयात हलविले. तेथून पुढील उपचारासाठी विष्णुपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मयत कोमल हिने मृत्यूपूर्व दिलेल्या जबाबावरून पतीविरुद्ध कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद मोरे व के. एस. पठाण यांनी पूर्ण करून दोषारोप पत्र बिलोलीच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सात जणांच्या साक्षी तपासण्यात आल्या.
त्यानंतर न्यायाधीशांनी आरोपी पिराजी माधव कुंभारगावे यास जन्मठेपेची शिक्षा, पाच हजार रुपये दंड व दंड भरला नाही तर सहा महिन्याचा सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता दीप्ती कुलकर्णी यांनी बाजू मांडली तर पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक इजुलकंटे यांनी काम पाहिले.