साहेब आमच्यासगट बैल पण उपाशी हाईत

बाबूराव पाटील
Saturday, 19 December 2020

पांढरं सोनं म्हणून कापसाची ओळख आहे, ते पण पावसाने मार खाल्ल्याने ऊत्पन्न घटले आहे. जे काही पसाभर कापूस घरात आला ते विकून घरदार सावरावं यासाठी शहरातील व्यंकटेश कॉटन जिंनीगमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी रितसर बाजार समितीकडे आॅनलाइन नोंदणी करून बैलगाडी व चारचाकी वाहने उभी केली आहेत. शासनाने ऊशीरा खरेदी सुरू केल्याने केंद्रावर शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केली आहे. 
 

भोकर ः यंदाचं सालच लय बिकट निघालयं बघा, सगळी संकट शेतकऱ्यांच्याच नशिबी आलीत...टिपुर पावसानी पाठ काय सोडली नाही, शेतातील पिकांची नासाडी झाली… पसाभर कापूस निघाला त्यो विकून कसंबसं सावराव म्हटलं तर कापूस खरेदी केंद्रावर समंदा गोंधळ... साहेब आमच्यासगट आमचं बैल पण तीन दिवसांपासून उपाशी हाईत.. अशी व्यथा शेतकऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली आहे. भोकर तालुक्यात यावर्षी वरूणराजा अधिकच मेहबान झाल्याने खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली आहे. 

 

पांढरं सोनं म्हणून कापसाची ओळख आहे, ते पण पावसाने मार खाल्ल्याने ऊत्पन्न घटले आहे. जे काही पसाभर कापूस घरात आला ते विकून घरदार सावरावं यासाठी शहरातील व्यंकटेश कॉटन जिंनीगमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी रितसर बाजार समितीकडे आॅनलाइन नोंदणी करून बैलगाडी व चारचाकी वाहने उभी केली आहेत. शासनाने ऊशीरा खरेदी सुरू केल्याने केंद्रावर शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केली आहे. या वेळी अधिकृत नोंदणीधारक आणि अनाधिकृत शेतकरी यांच्यातच कापूस घेण्याची स्पर्धा सुरू झाली. काही शेतकऱ्यांनी जिनींग मध्ये जाऊन काटा बंद केला. याबाबत तक्रारी झाल्याने जिल्हाधिकारी यांनी येथील तहसीलदार भारत सूर्यवंशी यांना शुक्रवारी (ता.१८) रोजी प्रत्यक्ष भेट देऊन मार्ग काढण्याचीही सुचना केली. त्यामुळे शनिवारी (ता.१९) रोजी बाजार समिती आणि जिनींग मालक यांनी जातीने लक्ष देऊन कारभार सुधारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. 

हेही वाचा -  मातृवंदन योजनेतून गर्भवतींचे पोषण, ५३ हजार महिलांना २१ कोटींचा मिळाला लाभ

 

शेतकरी आला अडचणीत
येथील कापूस खरेदी केंद्रावर सावळा गोंधळ सुरू झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. भाड्याने आणलेल्या वाहनांचा किराया वाढतो आहे. पोटाला पोटभर भाकर नाही. बैलाला वैरण नाही. थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागत आहे. व्यथा कुणाकडे मांडावी या विवंचनेत शेतकरी मेटाकुटीला आला आहे. 

 

येथील शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मी स्वता केंद्राला भेट देऊन तेथील जिनिंग मालक देवानंद धुत यांच्याशी चर्चा केली आहे. दोन दिवस सलग सुट्या आल्याने सोमवारपासून सर्व कारभार सुरळीत केला जाणार आहे. कुणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली आहे. शेतकऱ्यांनी संयम ठेवून आम्हाला सहकार्य करावे. 
- जगदीश पाटील भोसीकर, सभापती बाजार समिती, भोकर. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds Of Farmers At The Cotton Center, Nanded News