ऑनलाईन व्यवहाराला इंटरनेटचाच ब्रेक; अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे ग्राहकात संताप 

प्रल्हाद कांबळे
Thursday, 14 January 2021

ऑनलाईन व्यवहारासाठी चांगल्या स्पीडचे इंटरनेट असेल तरच ऑनलाईन व्यवहार सुरळीत होऊ शकतो

नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोटा हाताळल्याने कोरोनाचा प्रसार होतो यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार ऑनलाईन व्यवहाराला चालना देण्याचा प्रयत्न करत असताना प्रत्यक्षात मात्र ग्राहकाना व्यवहार करताना व्यापारी, पेट्रोलपंपवाले पुरेसे इंटरनेट उपलब्ध नसल्याने बगल देत आहेत. त्यामुळे कोरोनाची भीती असतानाही ऑनलाईन व्यवहार करण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

ऑनलाईन व्यवहारासाठी चांगल्या स्पीडचे इंटरनेट असेल तरच ऑनलाईन व्यवहार सुरळीत होऊ शकतो. परंतु इंटरनेट वारंवार स्पीड कमी होणे, बफरींग होणे, ट्रान्सजेशन फेल होणे, ट्रान्सजेशन पूर्ण होवूनही संबंधितांना मॅसेज न मिळणे आदी बाबींना सामोरे जावे लागत आहे. 

ऑनलाईन व्यवहाराचा कणा असलेल्या इंटरनेट जर सुरळीत नसेल तर त्यामुळे बर्‍याच जणांना पैसे मिळूनही पैसे न मिळाल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे बर्‍याच जणांनी ऑनलाईन व्यवहाराला दूर ठेवून ऑफलाईन व्यवहार करण्याला प्राधान्य देत आहेत. यामुळे नोटा हाताळण्यामुळे कोरोना व यासारख्या आजाराला ग्राहक बळी पडण्याची शक्यता असल्याची भीती ग्राहकांतून व्यक्त केली जात आहे.

ऑफलाईन व्यवहारामुळे कोरोनाच्या संसर्ग वाढण्याची शक्यता?

शहरी भागातील 65 ते 70 टक्के लोक ऑनलाईन व्यवहार करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु इंटरनेटच्या वारंवार होणार्‍या विस्कळीत होण्यामुळे ग्राहक व व्यापारी ऑनलाईन व्यवहार टाळत आहेत. यामुळे ऑफलाईनमध्ये नोटा हाताळण्यामुळे कोरोनासारख्या गंभीर आजाराच्या संसर्गाची शक्यता वाढत आहे, अशी भीतीही ग्राहकातून व्यक्त होत आहे.

सायबर क्राईमच्या गुन्ह्यातही वाढ

विस्कळीत होत असलेल्या इंटरनेटमुळे अनेकांना पैसे मिळत नाहीत अशा तक्रारी ग्राहक करत आहेत तर याबाबतच्या तक्रारी पोलिसांना देऊन गुन्हा दाखल करण्यात येत आहे. परंतु या सर्वाचे मूळ इंटरनेटच्या विस्कळीतपणामुळे सायबर क्राईमच्या गुन्ह्यातही वाढ होत आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Customers are angry over the authorities' disregard for online transactions nanded news