esakal | नांदेडकरांमध्ये सायकलिंगची क्रेझ, चिमुकल्यांसह ज्येष्ठ नागरिकांनाही लागले वेड

बोलून बातमी शोधा

file photo}

नांदेड शहर व जिल्ह्यामध्ये नियमित सायकल चालवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड सायक्लिस्टचा ग्रुप समाजामध्ये फिटनेसचा संदेश देतात.  

नांदेडकरांमध्ये सायकलिंगची क्रेझ, चिमुकल्यांसह ज्येष्ठ नागरिकांनाही लागले वेड
sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः कोरोना विषाणुने नागरिकांना जगायचे कसे शिकवले. त्यामुळे दररोजच्या धावपळीच्या जीवनातून शरीर सुदृढ राहण्यासाठी नागरिक स्वतःची काळजी घेताना दिसत आहे. फिट राहण्यासाठी आज शहरातील अनेक भागात वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल चालविताना चिमुकले, तरुण व ज्येष्ठ नागरिकांची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे.    

जुन्या काळात कामानिमित्त वापरली जाणारी सायकल आज व्यायामासाठी वापरली जात असली तरी पुढे भविष्यात पुन्हा कामासाठीच सायकलचा वापर होणार असल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक भागात सकाळ, सायंकाळ चिमुकल्यांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सायकल चालविताना दिसून येत आहेत. जणू सायकलींची शर्यत लागली असल्याचे दृश्य आता नित्याचेच झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत अनेक तरुणांमध्ये ‘फिटनेस'ची आवड निर्माण झाली. यातूनच सायकलला सुगीचे दिवस आले.

चिमुकल्यांनाही ‘आवडे सायकल' अशी स्थिती

आता तर चिमुकल्यांनाही ‘आवडे सायकल' अशी स्थिती आहे. यात वृद्धही मागे नाहीत. ज्येष्ठ नागरिकांनीही निरोगी राहण्यासाठी सायकलचाच आधार घेतल्याचे दिसून येते. कुठलाही दुष्परिणाम नसलेला व्यायाम म्हणजे सायकलिंग असल्याचे सायकलपटू नितीन जोशी यांनी सांगितले. घराजवळच असलेल्या दुकानांत, भाजी बाजारात जायचे असल्यास सायकलचाच वापर करावा. धावल्यामुळे गुडघे दुखतात. परंतु कुठल्याही वयोगटातील नागरिकाने सायकल चालविल्यास स्नायू मजबूत होतात, फुप्फुसांचा व्यायाम होतो, असेही सायक्लिंगचे फायदे आहेत.

सायकल चालविण्याचे फायदे

- एरोबिक प्रकार असल्याने शरीरावर ताण पडत नाही.
- हृदय, फुप्फुसे, रक्तप्रवाह सुधारतो.
- उदास राहणे, तणाव, चिडचिडेपणा कमी होतो.

अशी घ्या काळजी

- रस्त्यावर सायकल चालविताना हेल्मेटचा वापर आवश्यक
- कुठल्या कामासाठी सायकल हवी, त्यानुसार निवड
- कडक, लहान सीट असलेल्या सायकलचा वापर टाळा

सायकल चालविण्यासाठी खूप फिटनेसची गरज नाही

मी सकाळ व संध्याकाळ नियमित सायकल चालवतो. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी सायकल उपयुक्त आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा. सायकल चालविण्यासाठी खूप फिटनेसची गरज नाही.
- नितीन जोशी, सायकलपटू, नांदेड.

संपादन- प्रल्हाद कांबळे