भोकर तालुक्यात दिव्याखाली अंधार

बाबूराव पाटील
Friday, 23 October 2020


भारतीय जनता पक्षाने विकासात कधीच राजकारण केले नाही. निवडणुकीत हेवेदावे सुरू असतात त्यानंतर त्याला आम्ही बगल देतो. ज्यांनी राज्याची धूरा सांभाळली त्यांच्या मतदारसंघात एकही उद्योग सुरू केला नाही. सगळ्यात जास्त भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. मानाचे पद मिळूनही तालुक्यात दिव्याखाली अंधार आहे. अशी कोपरखळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शुक्रवारी कुणाचे नाव न घेता लगावली. 
 

भोकर, (जि. नांदेड) ः भारतीय जनता पक्षाने विकासात कधीच राजकारण केले नाही. निवडणुकीत हेवेदावे सुरू असतात त्यानंतर त्याला आम्ही बगल देतो. ज्यांनी राज्याची धूरा सांभाळली त्यांच्या मतदारसंघात एकही उद्योग सुरू केला नाही. सगळ्यात जास्त भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. मानाचे पद मिळूनही तालुक्यात दिव्याखाली अंधार आहे. अशी कोपरखळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शुक्रवारी (ता.२३) कुणाचे नाव न घेता लगावली. 

कोरोना योध्दा म्हणून गौरव 
शहरात भाजपच्या वतीने येथील शेतकरी निवास मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा व कोविड योद्धाचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या वेळी जिल्हाध्यक्ष गोजेगावकर, किशोर देशमुख, निलेश देशमुख, दिलीप सोनटक्के, कीशोर पाटील लगळूदकर, महिला आघाडीच्या विजया घिसेवाड, गणपत पीट्टेवाड, हरिदत्त हाके, गणेश कापसे बटाळकर, राजू अंगरवाड, बाळा साखळकर, प्रकाश कोंडलवार, माऊली पाटील चिंचाळकर, मोहन पाटील हस्सापूरकर यांची उपस्थिती होती. या वेळी खासदार चिखलीकर म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या काळात भाजपने शहरी व ग्रामीण भागातील गरजूंना मोलाची मदत केली आहे. त्याशिवाय गुणवंत विद्यार्थी आणि आरोग्य विभाग, पोलिस, महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव केला आहे.

हेही वाचा -  नांदेड शहरात रहदारीच्या ठिकाणी होणार ‘नो बॅनर झोन’ 
 

सध्या परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असून खरिप हंगाम पाण्यात गेला आहे. भोकर तालुक्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कुणी वाली उरला नाही. मानाचे पद हे जनतेमुळे मिळाले आहे. त्याचा सदुपयोग होत नाही ही शोकांतिका आहे. भाजप शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. भविष्यातही राहिल अशी ग्वाही खासदार चिखलीकर यांनी या वेळी दिली. प्रास्ताविक किशोर पाटील लगळूदकर यांनी केले, तर बालाजी वाघमारे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले आहे. 

 
कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 
अर्धापूर ः वीज वितरण कंपनीच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. या दोन घटना अर्धापूर व लहान येथे झाल्या आहेत. या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक फरार झाला आहे. तर एक आरोपी अल्पवयीन आहे. अर्धापूर शहरातील तामसा रस्त्यावरील डीपीचे वायर जळाल्याने वीजपुरवठा गुरुवारी (ता.२२) खंडित झाला होता. याप्रकरणी शहरातील ग्राहक वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात गेले असता ग्राहक व विद्युत सहायक गंगाधर शिंदे यांच्यात वाद झाला. विद्युत कर्मचारी शिंदे यांना शिवीगाळ करून मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशी फिर्याद गंगाधर शिंदे यांनी दिल्यावरून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहे; तसेच लहान येथील घटनेत रमेश गिरीश हे बसस्थानक परिसरातील विद्युत खांब स्थलांतरित करण्यासाठी गेले असता तिघांनी आमच्या भूखंडासमोर काम करू नका म्हणून मारहाण करून शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशी तक्रार वरिष्ठ तंत्रज्ञ रमेश गिरी यांनी दिल्यावरून अर्धापूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darkness Under The Lamp In Bhokar Taluka, Nanded News