सुनेला ठार मारुन वेशांतर करुन राहिला, मात्र पोलिसांच्या...

प्रल्हाद कांबळे
Monday, 24 August 2020

. तो वेशांतर करुन लॉजवर राहत होता. मात्र लॉजमधील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने तो अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याला नायगाव न्ययालयाने एक दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे.

नांदेड : नायगाव तालुक्यातील देगाव येथे आपल्या सुनेला ठार मारून फरार असलेल्या सासऱ्यास वजिराबाद पोलिसांनी नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून शनिवारी (ता. २२) रात्री अटक केली. तो वेशांतर करुन लॉजवर राहत होता. मात्र लॉजमधील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने तो अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याला नायगाव न्ययालयाने एक दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नायगाव तालुक्यातील देगाव येथील किशन विठोबा मोरे (वय ६०) हे आपली पत्नी पंचाबाई हिला किरकोळ कारणावरून मारहाण करीत होता. तेंव्हा त्यांच्या मारहाणीपासून आपल्या सासूला वाचवण्यासाठी सून मीराबाई ही मध्ये पडली. तेव्हा रागाच्या भरात संतापाचा पारा चढलेल्या मीराबाईला बेदम मारहाण करून रक्तबंबाळ केले. बेशुद्ध पडल्यानंतर किशन मोरे पळून गेला. जखमी सुनेला रुग्णालयात उपचारासाठी नेले जात असताना वाटेतच ती गतप्राण झाली. ही घटना ता. १९ ऑगस्ट रोजी नायगाव तालुक्यातील देगाव येथे घडली होती.

हेही वाचा नांदेडमध्ये सर्पदंशाने तिघांचा बळी, आमदार हंबर्डे यांच्याकडून कुटुंबियांचे सांत्वन

वेशांतर करुनही आले अंगलट

पोलिसांच्या डोळ्यात धूळ टाकण्यासाठी किशन मोरे याने वेशांतर करुन तो नांदेड शहरात आला. नेहमी अंगातील धोतर काढून काळसर रंगाची पॅन्ट व फिकट रंगाचा शर्ट परिधान केला. डोक्याचे केस काढून टक्कल केले. मिशा काढल्या. पायात काळा रंगाचा बूट. डोक्यावर टोपी असा किशन मोरेचा नवीन पेहराव होता. अशा रीतीने तो वेश बदलून नांदेडच्या बसस्थानक भागातील दीपक लॉजवर राहत होता.

कुंटुंर पोलिसांची वाढविली होती डोकेदु:खी

घटनेबाबत वर्तमानपत्रातील बातमी वाचून लॉजचे मालक व कर्मचारी यांना शंका आली. त्यांनी सदरच्या संशयास्पद व्यक्तीची वजिराबाद पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांना माहिती दिली. श्री. शिवले यांनी तात्काळ आपल्या डीबी पथकाला तिथे जावून पाहणी करण्यास सांगितले. पोलिसांनी ता. २२ ऑगस्ट रोजी अटक केली. याबाबतची माहिती कुंटूर पोलिसांना देण्यात आली. शनिवारी रात्रीच कुंटुर पोलीस ठाण्याच सहाय्यक पोलिस निरीक्षक करीम पठाण हे वजीराबाद येथे आले. त्यांनी आपल्या पोलिस ठाण्याच्या दप्तरी असलेला खूनी किशन मोरे याला ताब्यात घेतले. किशन मोरे याला नायगाव न्यायालयासमोर रविवारी (ता. २३) हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडीत पाठविली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: daughter- in- law was killed and disguised, but the police nanded crime news