कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातील आडगाव येथील कर्जबाजारी शेतकऱ्या आत्महत्या केली तर दुसऱ्या घटनेत हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील शेतकरी महिलेला विद्यूत शॉक लागल्याने तिचा मृत्यू झाला. 

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने ऐन पेरणीत वीष पीऊन आत्महत्या केली. ही घटना आडगाव (ता. लोहा) येथे शुक्रवारी (ता. १२) सकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.

आडगाव (ता. लोहा) येथील शेतकरी दामोधर रामराव क्षिरसागर (वय ४०) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. यामुळे घरगाडा चालविण्यासाठी त्याने बँकेचे कर्ज काढले. शेतीतून उत्पन्न मिळेल या आशेवर कर्ज काढले मात्र नापिकी होत राहिल्याने कर्जाची परतफेड वेळेत करु शकले नाही. कर्जाचा डोंगर वाढतच गेला. पुन्हा या वर्षी पेरणीसाठी बियाणे घेउ शकत नसल्याने त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शेवटी दामोधर क्षिरसागर याने शुक्रवारी (ता. १२) सकाळी आपल्या शेतात जावून वीष पीऊन आत्महत्या केली. ही माहिती ज्ञानेश्‍वर रामराव क्षिरसागर यांनी लोहा पोलिस ठाण्यात दिली. यावरुन लोहा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक आर. के. कुऱ्हे करत आहेत. 

हेही वाचा -  धनदांडग्यांचा मोफत धान्यावर डल्ला.....कुठे ते वाचा

विद्यूत शॉक लागल्‍याने महिलेचा मृत्यू 

नांदेड : शेतातील जनावरांना चारा- पाणी करण्यासाठी गेलेल्या एका महिलेला विद्यूत शॉक लागल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. ११) गारगव्हाण (ता. हदगाव) शिवारात घडली. 

गारगव्हाण (ता. हदगाव) येथील मनकर्णाबाई बालाजी तांबारे (वय ४२) ही आपल्या शेतातील जनावरांना चारा- पाणी टाकण्यासाठी गुरूवारी (ता. ११) गेली होती. चारा- पाणी टाकत असतांना विद्यूत पंपाचा धक्का लागल्याने तिला जबर शॉक बसला. यात ती बाजूलाच असलेल्या दगडावर पडल्याने डोक्याला गंभीर मार लागला. तसेच तिच्या उजव्या हातावर वायर पडल्याने पुन्हा जबर शॉक लागून बेशुध्द झाली. 

मनाठा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद 

नातेवाईकांनी लगेच तिला हदगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिच्यावर उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे रुग्णालय सुत्रांनी सांगितले. या प्रकरणी सुरेश केरबा तांबारे यांच्या माहितीवरून मनाठा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस हवालदार श्री. पवार करत आहेत. घटनास्थळाला सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे यांनी भेट दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debt-ridden farmer commits suicide nanded news