नांदेड : कर्जमाफीच्या जाचक अटीना शेतकरी वैतागले

प्रल्हाद कांबळे
Friday, 14 August 2020

तत्कालीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्ज माफीची घोषणा केली होती. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्ण माहिती देणे बंधनकारक होते.

नांदेड : शेतकरी सन्मान योजना अंतर्गत पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठे अर्धवट तर कुठे पूर्ण रक्कम जमा करण्यात आल्याच्या तक्रारी वाढत आहेत. जाचक नियम वाढीमुळे पीक कर्जापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. तत्कालीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्ज माफीची घोषणा केली होती. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्ण माहिती देणे बंधनकारक होते. त्यामध्ये अनेक नियम व अटी असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी या नियमात बसले नाहीत. त्यामुळे त्यांना कर्जमाफी मिळाली नाही.

ज्या काही शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला. त्यांच्या खात्यावर पूर्ण रक्कम जमा न करता दीड लाखांच्या आत पिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अर्धवट रक्कम जमा करण्यात आली. यानंतर उर्वरित रक्कम भरा तरच तुम्हाला नवीन पीक कर्ज मिळेल, असे बँक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. अनेकांना तर दीड लाख रुपये सोडा पण एक लाखाच्या आत असलेल्यांची सुद्धा पूर्ण कर्जमाफी झाली नाही. कर्जमाफीची प्रक्रिया किचकट असल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले.

हेही वाचा चार दिवसांच्या रिमझिम पावसाने पाणीपातळीत वाढ, कुठे ते वाचा...

शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे मेसेज आले

यानंतर आघाडी सरकारने कर्जमाफी योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना केले. या दीड लाखांची कर्जमाफीची रक्कम वाढवून दोन लाख रुपये केली. शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्ती नसून सरसकट दोन लाख पिक कर्ज असलेल्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी घोषणा केली. मार्च- एप्रिलमध्ये ही रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे मेसेज आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debt waiver oppressor farmers annoyed nanded news