शेतकऱ्यांच्या हितासाठी कवळे गुरुजींनी घेतला हा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020


उमरी, धर्माबाद आणि नायगाव तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून या भागात (कै.) डॉ. शंकरराव चव्हाण आणि कारखान्याचे चेअरमन (कै.) लक्ष्मणराव हस्सेकर यांनी वाघलवाडा येथे शंकर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. वाघलवाडा कारखाना हा पूर्णपणे यशस्वी ठरला होता. मध्यंतराच्या काळात हा कारखाना चालू होता, पण नंतर बंद पडला. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने हा कारखाना ताब्यात घेऊन युनिट क्रमांक तीन म्हणून यशस्वीरीत्या चालवून दाखवला. त्यानंतर काही अडचणींमुळे भाऊराव कारखान्याने हा कारखाना श्री. कवळे गुरुजींच्या ताब्यात दिला आहे.

उमरी, (जि. नांदेड) ः भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या ताब्यात असलेला वाघलवाडा येथील शंकर सहकारी साखर कारखाना उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांनी ५१ कोटी २१ लाख रुपयांना खरेदी करून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर बुधवारी (ता. २४) अधिकृतरीत्या ताब्यातही घेतला आहे. या माध्यमातून परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवक व शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती श्री. कवळे गुरुजी यांनी दिली.

 

हेही वाचा -   मियावाकी वृक्षलागवडीसाठी पुढाकार घ्यावा.....कोण म्हणाले ते वाचा

मागील नांदेड लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसतर्फे पालकमंत्री अशोक चव्हाण हे निवडणूक रिंगणात होते. देशात काॅँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांची आघाडी होती. तेव्हा उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी हे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष म्हणून होते. त्या निवडणुकीत कवळे गुरुजी यांनी पक्षाचे ध्येय धोरण अवलंबून अशोक चव्हाण यांचा प्रचार एकनिष्ठेने केला होता. तेव्हापासून पालकमंत्री चव्हाण यांच्या संपर्कात कवळे गुरुजी आले.

संचालकाचा एकमुखी निर्णय
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यांतर्गत असलेला शंकर सहकारी साखर कारखाना हा विकायला काढण्यात आला. तेव्हा कवळे गुरुजी यांनी रीतसर सदर वाघलवाडा कारखाना खरेदीसाठी निविदा भरली. कवळे गुरुजी यांची निविदा पाहून या कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिकडे व सर्व संचालकानी एकमुखी निर्णय घेऊन रीतसर शंकर सहकारी साखर कारखाना हा उद्योजक कवळे गुरुजी यांच्या ताब्यात दिला.

भरभराटीला आणण्याचा प्रयत्न करू
आता या कारखान्यामुळे उमरी, नायगाव व धर्माबाद तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण, अध्यक्ष तिकडे व सर्व संचालकानी एकमुखी निर्णय घेऊन माझ्यावर विश्‍वास ठेवत कारखाना दिला असून, तो मी यशस्वीरीत्या चालवून दाखवणार आहे. या तीनही तालुक्यांतील शेतकरी आर्थिक बाजूने कसा सुधारेल व सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार देऊन या भागातील व्यापारपेठही पुढील काळात भरभराटीला आणण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन उद्योजक कवळे गुरुजी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Decision Was Taken By Kavale Guruji For The Benefit Of The Farmers, Nanded News