कोरोना पार्श्वभूमीवर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मास्क वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने दम्याच्या रुग्णांमध्ये घट  

प्रमोद चौधरी
Monday, 18 January 2021

विविध आजारांविरोधात मास्क ठरतोय फायद्याचा  

नांदेड ः मास्क घातल्यामुळे प्रदूषणापासून बचाव होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पुढे आले आहे. श्वसनविकारावर मास्क वरदान ठरत असून रुग्णसंख्येत ७५ टक्के घट झाल्याचेही या तज्ज्ञांचे मत आहे.

श्वसन, फुप्फुस, छातीशी संबंधित आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी शंभर रुग्णांपैकी ३० ते ४० टक्के रुग्णांमध्ये गंभीर दमा, सीओपीडी, श्वसनाशी संबंधित गंभीर आजार दिसून येत होते. फुप्फुसाशी संबंधित गंभीर आजाराचे रुग्णांची संख्या बऱ्यापैकी होती. परंतु कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मास्क आणि इतर सुरक्षित साधनांचा वापर वाढला. प्रदूषण, धुलीकणामुळे होणारा दमा, सीओपीडी तसेच श्वसनाच्या इतरही आजाराचे रुग्ण कमी झाल्याचे निरीक्षणातून पुढे आले.

कोरोनानंतर लॉकडाउन शिथिल झाल्यावर हळू-हळू रुग्ण वाढू लागले असले तरी त्यात गंभीर संवर्गातील रुग्णांची संख्या सुमारे ७५ टक्क्यांनी घटली आहे. सध्या दिवसाला २५ ते ३० रुग्ण उपचाराला येतात. त्यातील दहा टक्क्यांपेक्षा कमी व्यक्तींमध्ये गंभीर दमा दिसतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचापरभणी : कुपटा येथिल कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच

संभ्रम होणार दूर

शिंका किंवा खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या कोरोनाच्या विषाणूपासून बचाव करणारा संरक्षक म्हणून मास्ककडे बघितले जात आहे. मात्र, मास्क घातल्याने श्वसनाचे आजार जडतात, असा संभ्रम सामाजिक माध्यमांवर पसरत होता. मात्र, सध्याची रुग्णसंख्या बघता मास्क कसा परिणामकारक ठरत आहे हे दिसून येत असल्याचा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला.
 
हवेतून कोरोना पसरण्याची भीती लक्षात घेता कोरोना प्रतिबंधासाठी मास्क वापरणे सुरू झाले. शिंका किंवा खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबांपासून बचाव मास्कमुळे होतोच. पण, हवेतील प्रदूषणांपासून मास्क बऱ्यापैकी संरक्षण करू शकतो, हे सत्य श्वसनविकाराच्या रुग्णांच्या नोंदीतून पुढे आले आहे. ‘ड' जीवनसत्त्वासाठी हिवाळ्यामध्ये सकाळी तासभर सूर्यप्रकाशात उभं राहणं फायदेशीर ठरेल.
- प्रा. डॉ. प्रशांत सोनवणे, श्वसनरोग तज्ज्ञ.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decrease in asthma patients due to increase in the number of people wearing masks on the advice of experts on corona background nanded news