esakal | Deglur Election: भाजपने पुन्हा फेकला उसनवारीचा पत्ता!
sakal

बोलून बातमी शोधा

Deglaur Election: भाजपने पुन्हा फेकला उसनवारीचा पत्ता!

Deglur Election: भाजपने पुन्हा फेकला उसनवारीचा पत्ता!

sakal_logo
By
- दयानंद माने

औरंगाबाद : विधानसभेच्या देगलूर - बिलोली मदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने आज पुन्हा एकदा उमेदवारांच्या उसनवारीचा पत्ता फेकला. पंढरपूर पोटनिवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीतील मतभेदांचा व समन्वयाच्या अभावाचा फायदा घेत उमेदवारी विरोधकांकडूनच आयात करत भाजपने ‘राष्ट्रवादी’ला अस्मान दाखवले होते. तोच कित्ता आज देगलूरमध्ये गिरविण्यात आला आहे.

दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर होत असलेल्या या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेसचे राज्यातील नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी फार सावध पावले उचलली आहेत. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत भारत भालके यांच्याबाबतच्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा भगीरथ भालकेंना मिळाला नव्हता, हे हेरून इथेही इतर उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. तसेच जिल्हा नियोजन व विकास, दलित वस्ती सुधार योजना व इतर विविध प्रकारच्या विधींच्या वाटपाची खैरात देगलूर- बिलोलीवर या काळात करण्यात आली. अंतापूरकरांचे चिरंजीव जितेश यांनाही सक्रिय राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. दरम्यान, गेल्या अनेक निवडणुकांत या मतदारसंघात शिवसेना व कॉंग्रेस अशीच लढत झाली आहे.‌ यंदा मात्र हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीतील मित्र पक्ष बनल्याने कॉँग्रेसला इथे मोकळे रान असल्याचे भासत होते. मात्र या मतदारसंघाचे नेतृत्व व खडानखडा माहिती असलेल्या सुभाष साबणेंना आपल्या तंबूत खेचून भाजपने आज कॉंग्रेससमोर डाव टाकला आहे. साबणेंच्या नावाची घोषणा आज झाली असली तरी नेपथ्य रचना अनेक दिवसांपासून सुरू होती. आज ठरलेल्या स्क्रिप्टप्रमाणे सारे घडत गेले.

पारंपरिक घराण्यांतील पुन्हा लढत

सुभाष साबणे यांनी आधी दोनवेळा शेजारच्या मुखेडमधून (१९९९ व २००४) व देगलूरमधून (२०१४) आमदारकी भूषविली आहे. तर त्यांचे वडीलही मुखेडमधून १९६२ मध्ये आमदार होते. रावसाहेब अंतापूरकरही देगलूरमधून २००९ व २०१९ असे दोन वेळा निवडून आले. आता पुन्हा या भागातील पारंपरिक घराण्यांतील लढत पाहायला मिळणार आहे. प्यादी वेगवेगळी असली तरी खरी लढत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी व भाजप अशीच असणार, हे उघड आहे. यानिमित्त लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पराजय व विजयानंतर अशोकरावांचा पुन्हा एकदा कस लागणार आहे, एवढे मात्र निश्चित.

loading image
go to top