देगलूरला बुधवारपासून होणार सुरळीत पाणीपुरवठा

पंप हाऊसचे सील उघडले; नगरपालिकेने दिला पाच लाखांचा धनादेश
Degloor will smooth water supply
Degloor will smooth water supply

देगलूर : पाटबंधारे विभागाची ३५ लाखांची थकबाकी देगलूर नगरपालिकेकडून थकीत असल्याने जलसंपदा विभागाने सोमवारी (ता.२८) करडखेड येथील देगलूर शहराला करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या पंप हाऊसला सील ठोकले होते. त्यामुळे सोमवारी (ता. २८) व मंगळवारी (ता. २९) शहरातील काही भागांना होणारा पाणीपुरवठा झाला नसल्याने शहरवासियांना ऐन उन्हाळ्यात निर्जळीला तोंड देण्याची वेळ आली आहे.

जलसंपदा विभागाने करडखेड येथील पंप हाउसला लावलेले सील व सध्याचे उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन नगरपालिकेने गांभीर्याने तत्काळ पावले उचलत मंगळवारी (ता. २९) मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड यांनी पाच लाख रुपयांचा चेक पाटबंधारे विभागाचे अभियंता श्री. रामेश्वर पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

सोमवारी (ता. २९) दुपारी धनादेश प्राप्त झाल्यानंतर विभागाकडून लावण्यात आलेले सील काढण्यात आल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली. थकबाकीची रक्कम मोठी आहे. पंधराव्या वित्त आयोगातून येणारी रक्कम अद्याप देगलूर नगरपालिकेला प्राप्त झाली नाही. ती आल्यानंतर मुख्याधिकारी श्री. ईरलोड यांनी उर्वरित रक्कम भरण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाला दिल्याचे श्री. पवार म्हणाले. त्यामुळे शहरवासीयांना गैरसोयीचे असल्याने विभागाने तत्काळ सील काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

करडखेड प्रकल्पात ७७ टक्के पाणीसाठा

देगलूर शहरासह काही गावांना संजीवनी ठरणारा करडखेड मध्यम प्रकल्पात सध्या ७७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून योग्य नियोजन व अशाच पद्धतीने शहराला पाणीपुरवठा सुरू ठेवला तर येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा सुरू राहू शकतो. यासाठी पाटबंधारे विभागाकडून नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. करडखेड ते देगलूर या दरम्यानच्या पाईपलाईनला काही ठिकाणी गळती लागली आहे. त्याची दुरुस्ती नगरपालिकेने तत्काळ हाती घेण्याची मागणी या निमित्ताने केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com