esakal | दारु दुकान हटवा मगच सरपंच, उपसरपंच निवडा; नायगावात संतप्त रणरागिनींचा ठिय्या आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दुर्गेचे रुप धारण केलेल्या रणरागिनींसमोर अखेर पोलिस प्रशासनसुध्दा झुकले. रणरागिनींच्या ठिय्या आंदोलनामुळे सरपंच, उपसरपंच निवडीची सभा तहकूब करुन मंगळवारी (ता. नऊ) रोजी ठेवण्यात आली.

दारु दुकान हटवा मगच सरपंच, उपसरपंच निवडा; नायगावात संतप्त रणरागिनींचा ठिय्या आंदोलन

sakal_logo
By
सुरेश घाळे

धर्माबाद ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील नायगाव (ध) येथील दारु दुकान हटविण्याच्या मागणीसाठी नायगावच्या संतप्त रणरागिणींनी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडी दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवारी (ता. आठ) रोजी चार तास ठिय्या आंदोलन करुन सदस्यांना कार्यालयात जाण्यास प्रतिबंध केला. दुर्गेचे रुप धारण केलेल्या रणरागिनींसमोर अखेर पोलिस प्रशासनसुध्दा झुकले. रणरागिनींच्या ठिय्या आंदोलनामुळे सरपंच, उपसरपंच निवडीची सभा तहकूब करुन मंगळवारी (ता. नऊ) रोजी ठेवण्यात आली.

तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या धर्माबाद तालुक्यातील नायगाव (ध) या गावाची लोकसंख्या एक हजार ४०० च्या जवळपास आहे. येथे एक परवानाधारक देशी दारु दुकान आहे. या गावात दारुड्यांचा त्रास वाढला असून गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थीही देशी दारु पिऊन गोंधळ घालीत आहेत. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने माताभगिनी दुर्गेचे रुप धारण करीत दारुबंदीसाठी निर्धार केला. प्राथमिक शाळेतील मुलेही खाऊचे पैसे एकत्र जमवून दिवसाढवळ्या देशी दारु पिऊन पार्ट्या करीत आहेत. गावातील पुरुष मंडळी दारुच्या आहारी गेल्याने कर्जबाजारी होऊन रागाच्या भरात महिलांना मारहाण करीत गोंधळ घालीत आहेत. दारुमुळे " बायकोला सोडतील पण दारुला नाही " अशी परिस्थिती नायगाववासीयांची झाली आहे. या प्रकाराला कंटाळून नायगावच्या बचत गटाच्या १८० रणरागिणी गेल्या दोन महिन्यांपासून दारु दुकान बंद करण्यासाठी लढा देत आहेत. 

हेही वाचा - पंजाब पोलिसांनी खलीस्तान जिंदाबाद संघटनेशी संबंधित चार जणांविरुद्ध बंदी आदेश जारी केले होते

गेल्या महिन्यात तालुका प्रशासनाला तक्रार देऊनही काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर सर्व महिला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. व आपल्या दारुड्या नवऱ्यापासून होत असलेल्या त्रासाचा पाढाच जिल्हाधिकाऱ्यांसमोर वाचला होता. तक्रारी करुनही दुकान बंद होत नसल्याने संतापलेल्या रणरागिणी सोमवारी सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी दरम्यान नूतन सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यास प्रतिबंध केला. पहिले दारु दुकान हटवा, मगच सरपंच, उपसरपंच निवडा अशा गर्जना करीत ठिय्या आंदोलन केले. उपसरपंच होणाऱ्या सदस्यांच्या हातातील अर्ज घेऊन बाहेर हाकलून दिले. दारु दुकानदारांच्या गटाच्या एकही सदस्यांना आत जाऊ दिले नाही.

दरम्यान, गावचे सरपंचपद अनु. जातीसाठी राखीव असल्याने नागेंद्र सूर्यकार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. तर उपसरपंच पदासाठी चंद्राबाई बुयेवाड यांचाही एकच अर्ज दाखल झाला. मात्र कोरमअभावी सोमवारची सभा तहकूब करुन आज मंगळवारी ठेवण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार दत्तात्रय शिंदे, निवडणूक अध्यासिक अधिकारी जी. एस. गरूडकर, तलाठी यु. डब्लू. आडे, ग्रामसेवक एस. एस. जैस्वाल यांनी काम पाहिले. पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते, पोलिस उपनिरीक्षक अनिल सनगल्ले यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image