esakal | कोरोना फिव्हरमध्ये खेकडा आणि गावरानी अंड्याची मागणी वाढली

बोलून बातमी शोधा

file photo

गावरानी अंडा वीस रुपयाला तर काळा खेकडा आठशे रुपये किलो

कोरोना फिव्हरमध्ये खेकडा आणि गावरानी अंड्याची मागणी वाढली
sakal_logo
By
साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : कोरोना आजाराच्या वाढता प्रादुर्भावात गावठी उपचार पद्धतीवर अधिक भर दिले जात असल्याचे अनेक उदाहरणे माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळत आहेत. ग्रामीण भागातील अनेक लोक अजूनपर्यंत औषध गोळ्या व इंजेक्शन पासून दूर राहिले असल्याने किरकोळ आजारात आयुर्वेदिक औषधांचा काडा घेऊन काम भागवणाऱ्या सर्वसामान्य मजूर वर्ग कोरोना तपासणी पासून तर लसीकरण करून घेण्यापर्यंत अजून तरी दूरच असल्याचे दिसून येत आहे. 

वातावरणातील बदलाच्या परिणामामुळे सध्या सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखी आदी आजाराने थैमान घातले आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्याही तेवढ्याच प्रमाणात हजारोचा आकडा पार करत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभाग अधिकाधिक तपासणी व लसीकरण करण्यावर भर देत आहे. ग्रामीण भागात आयुर्वेदिक उपचाराचा भाग म्हणून काळ्या खेकड्याची कढी व उकडलेले गावरानी कोंबडीचे अंडे खाण्याला मात्र अधिक महत्व दिले जात आहे.

मागील वर्षभरापासून जीवसृष्टी कोरोना आजाराच्या दुष्टचक्रात सापडली आहे. शासन नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत आरोग्यविषयक सुविधा निर्माण करण्यात कुठेही कमी पडत नाहीये. परंतु या आजाराने एकच वेळी सर्वच घटकाला आपल्या अजगरी विळख्यात घेतल्याने मनुष्यबळाअभावी सर्वांनाच दर्जेदार उपचार मिळेल अशी परिस्थिती सध्या तरी नसल्याचा समज मनामध्ये निर्माण करून ग्रामीण भागात कोरोना तपासणी करण्यापासून तर कोविड लसीकरण घेण्यापर्यंत अनेक प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील संशयित कोरोना रुग्ण व तसेच बदलत्या वातावरणामुळे विषाणूजन्य आजाराने ग्रस्त रुग्ण जुन्या जाणकाराच्या सल्ल्यावरून गावठी टोटके करण्यावर अधिक भर देत आहेत. 

हेही वाचा नांदेडकरांनो...विनाकारण रस्त्यावर फिरून जीव धोक्यात घालू नका - विशेष पोलिस महानिरीक्षक तांबोळी

यात प्रामुख्याने नदी- नाले, तलावाच्या ठिकाणी सहज आढळून येणारा काळ्या रंगाचा खेकडा व गावरानी कोंबडीचे अंड्यांना प्राधान्य देत आहेत. खेकड्याची कढी व उकडलेली अंडी खाण्याचे प्रमाण अचानक वाढल्याने मागणीतही प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे एरवी शंभर दोनशे रुपये किलो वरून खेकड्याचे दर चक्क आठशे रुपये किलोवर नेऊन पोहोचवले आहे. घरगुती कोंबडी पालन करणाऱ्यांनी दहा रुपये किमतीला मिळणारे गावरान कोंबडी चे अंडे वीस रुपयाला करून टाकले आहेत. शहरातील खासगी दवाखान्यात उपचारा साठी गेलेल्या रुग्णांना खेड्यापाड्यातून खेकड्याची कढी आणि गावरानी अंडे पुरविले जात आहे. माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रात व पालाईगुडा तलावात मासेमारीचा व्यवसाय करणारे खेकडे विक्रीला प्राधान्य देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकंदरीत कोरोना प्रादुर्भाव व वायरल फीव्हर च्या निमित्ताने सहज उपलब्ध होणारे खेकडे आणि गावरानी अंड्याचे भाव वधारले आहे.

अंडी, मटन, मासे, खेकडे आदि हाय प्रोटीन डाइट खाणे चांगलेच परंतु कोविड लसीकरण करून घेणेही तेवढेच गरजेचे आहे. आपल्याकडे मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहेत. आपल्या तुलनेत इतर जिल्ह्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोविडची लस पूर्णतः सुरक्षित असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शक्य तितक्या लवकर नजीकच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण करून घ्या.

- डॉ. एस. बी. भिसे, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, माहूर.

संपादन- प्रल्हाद कांबळे