मानधनाअभावी वृद्ध कलावंतांची परवड, कशी? ते वाचाच  

प्रमोद चौधरी
Monday, 17 August 2020

कोरोना महामारीमुळे गावोगावी जावून आपल्या कलेतून समाजप्रबोधन करणाऱ्या कलावंतांना मानधन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

नांदेड : अनेक नव्या पिढीतील कलावंतांनी शासनाचे मानधन मिळवले; परंतु वृद्ध कलावंतांची शासनदरबारी कोणतीही नोंद नाही. हजारो कार्यक्रम सादर करणाऱ्या अशा मनस्वी कलावंताला कधी सादरीकरणाचा फोटो काढण्याची गरज वाटली नाही. कलेच्या मस्तीत तारुण्यात जगलेल्या या कलावंतांची मात्र वृद्धापकाळी परवड होत आहे.

महाराष्ट्र राज्याला थोर महात्मे, राष्ट्रीय संत, समाजसुधारक यांची अमूल्य देण लाभलेली आहे. समाजामध्ये रूढ झालेल्या अनिष्ट प्रथा, परंपरा यांच्यावर प्रबोधनाच्या माध्यमातून प्रहार करून समाजाला सतत जागृत करण्याचे काम वृद्ध कलावंत करत आहेत. मात्र, कोरोना महामारीमुळे त्यांचे मानधन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

हेही वाचा - नांदेडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन टॅंक दाखल

समाजाला सातत्याने करतात प्रबोधन
शहरीसह ग्रामीण भागामध्ये वृद्ध आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले कलावंत वास्तव्याला आहेत. आपल्या गावामध्ये आणि गावाव्यतिरिक्त इतरत्रही तालुका आणि जिल्ह्यामध्ये हे कलावंत संत ज्ञानेश्वर, तुकोबाराय, राष्ट्रसंत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि इतरही विभूतींनी सांगून ठेवलेल्या ज्ञानाच्या मार्गाने नागरिकांनी मार्गक्रमण करून व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती, रूढी, प्रथा परंपरांपासून नागरिकांनी दूर राहण्याचे प्रबोधन सातत्याने करतात.

हे देखील वाचाच -  नांदेड : भरधाव स्कार्पिओच्या धडकेत आजी- नातू ठार

मानधनाअभावी होत आहे उपासमार
त्यासाठी या वृद्ध कलावंतांना शासनाकडून दर महिन्याला ठराविक मानधन दिले जाते; परंतु जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांना मागील तब्बल सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नसल्यामुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे कलावंत वृद्ध असल्यामुळे यांना या वयात शरीर साथ देत नसल्याने औषधोपचारासाठी या मानधनाची गरज असल्याने जिल्हा आणि तालुका प्रशासनाने तातडीने या बाबीची दखल घेण्याची विनंती अशोक महाराज कुलकर्णी यांनी केली आहे.

येथे क्लिक कराच - विष्णुपूरी प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करा- खासदार हेमंत पाटील

कलावंतांना राजाश्रय मिळावा
आपल्या कलेने संस्कृतीची जोपासना करणाऱ्या लोककलावंतांना शासनाकडून मानधन प्राप्त झाले तर वृद्धापकाळात त्यांच्या कुटुंबाचे हाल होणार नाहीत. कलेला व कलावंतांना राजाश्रय मिळायलाच हवा. तसे झाले तर खऱ्या अर्थाने त्यांच्या कलेची कदर केल्यासारखे होईल. 
- अशोक महाराज कुलकर्णी   
 
ग्रामपंचायतस्तरावर माधनधनाची सोय व्हावी
आयुष्यभर या लोककलावंतांनी कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केलेले आहे. कलेची उपासना व सेवा आयुष्यभर करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील वृद्ध कलावंतांना ग्रामपंचायतस्तरावरुन काही शासकीय मानधनाची सोय करुन देता येईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. - सदाशिव महाराज (किर्तनकार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand For Honorarium For Older Artists Nanded News