नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू करण्याची का होतेय मागणी?  

प्रमोद चौधरी
Thursday, 24 September 2020

लॉकडाउनमुळे सर्वच शाळांनी आॅनलाईन शिक्षण देणे सुरु केले आहे. परंतु, हे शिक्षण प्रभावी ठरत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भिती आहे. त्यामुळे सर्व शाळा सुरु करून विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे पालन करून शाळेमध्येच शिक्षण देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

नांदेड : कोरोनासंदर्भात शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन जिल्ह्यातील सर्व शिक्षक करत आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइनद्वारे शिक्षण दिले जात आहे; परंतु काही ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून शिक्षण दिले जात असल्याने, शिक्षक व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे हा संभ्रम दूर करावा अशी मागणी ‘आस’ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा विद्यार्थ्यांविनाच भरविल्या जात आहेत. परिणामी, काही शैक्षणिक बिटमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून घेऊन त्यांना शिकवले जात आहे. त्यामुळे काही शाळा भरतात आणि काही भरत नाहीत हे कसे? असा पालक व शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी द्याव्यात. ज्यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसानीचे क्षेत्र वाढले

कशासाठी केली शाळा सुरु करण्याची मागणी
वास्तविक पाहता शाळेमध्ये समुहाने घेतलेले शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी अनंतकाळ टिकणारे असते. मित्रांसोबत अभ्यासाची स्पर्धा होत असल्याने आपोआपच अभ्यासात कमी असलेल्या विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढीसाठी वर्गातील शिक्षण प्रभावी ठरते. यापेक्षा अधिक म्हणजे शिक्षकाची पाठीवरील कौतुकाची थाप ही अभ्यासाला प्रेरणा देणारी असते. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात अनेक शैक्षणिक बिटमध्ये ग्रामस्थांच्या आग्रहास्तव विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलावून अध्यापनाचे धडे दिले जात आहे. काही शैक्षणिक बिटमध्ये असे होत नसल्यामुळे पालक व शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून ‘आस’ शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने जिल्ह्यातील सर्व शाळा सुरु करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

हे देखील वाचाच - करखेलीचा प्रमोद करतोय हायटेक शेती

याही आहेत मागण्या
याशिवाय शासन निर्णयानुसार अपंग कर्मचारी, शिक्षक यांची वेगळी सेवाज्येष्ठता यादी तयार करावी. ही यादी तयार करताना जे शिक्षक अपंग आरक्षणातून (तीन टक्के) नियुक्त झालेले आहेत, अशा शिक्षकांचाच त्यात समावेश करावा. आंतरजिल्हा बदली झालेल्या उर्वरित शिक्षकांना कार्यमुक्त करावे; तसेच आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषदेत रुजू झालेल्या शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना द्यावी. पात्र शिक्षकांना नियमान्वये वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी लागू करावी. शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीचे विवरणपत्र द्यावे. शासन निर्णयानुसार सीएमपी प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन अदा करण्यात यावे आदी मागण्यांचाही निवेदनामध्ये समावेश आहे. 

येथे क्लिक कराच - नांदेडला खासदारांच्या घरासमोर शेतकरी संघटनेचे राखरांगोळी आंदोलन

यांना दिले निवेदन
दरम्यान, संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक श्री. येरपुरवाल यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे प्रांताध्यक्ष युवराज पोवाडे, जिल्हाध्यक्ष नईमोद्दीन वकिलोद्दीन, प्रांत प्रतिनिधी प्रल्हाद पवार, रमेश माळगे, जिल्हा सचिव सुधाकर गायकवाड, जिल्हा संघटक सुदर्शन उपलंचवार, गोपीनाथ पोटफोडे, सारीपुत्र चावरे आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand To Start All Schools In Nanded District Nanded News