नांदेड जिल्ह्यात डेंग्यूचा प्रसार वाढला; २९ जणांना लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dengue in nanded

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेली ही आकडेवारी कोरोनानंतर आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी आहे

नांदेड जिल्ह्यात डेंग्यूचा प्रसार वाढला; २९ जणांना लागण

नांदेड: जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची काहीशी चिंता मिटली असली तरी पावसाळ्यात पाण्याचे डबके साचून त्यात ‘इडीस’ डासांची निर्मिती होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात डेंगी रुग्णांची संख्या वाढलेली दिसते. जानेवारी ते जुलै २०२१ दरम्यान जिल्हा हिवताप कार्यालय व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने १२५ रक्तजल तपासणी करण्यात आली होती. या मध्ये २९ जणांना डेंगी आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेली ही आकडेवारी कोरोनानंतर आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी देखील कुठल्याही साथीच्या रोगास हलक्यात न घेण्याच्या जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयास सक्त सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे डेंगीमुक्त नांदेड जिल्ह्यासाठी प्रत्येक शनिवार डेंगीच्या काळजीसाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. मागील वर्षी कोरोनाची रुग्ण अधिक प्रमाणात वाढले होते. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना संशयीत व्यक्तींचे पाहिजे त्या प्रमाणात रक्तजल तपासणी करता आली नव्हती.

जुलै २०२० अखेर केवळ १३ जणांचे रक्तजल नमुने घेतली गेले होते. यात एकही दुषित रुग्ण आढळून आला नव्हता. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच जिल्हा हिवताप कार्यालयाचे आरोग्य कर्मचारी, महापालिकेतील आरोग्य कर्मचारी रक्तजल नमुने तपासणी, चिकनगुणीया व मलेरीया रुग्ण तपासणीच्या कामाला लागले आहेत. जानेवारी ते जुलै २०२१ दरम्यान हिवताप तपासण्यासाठी एक लाख ४६ हजार ८६७ रक्तजल तपासण्यासाठी घेण्यात आली. परंतु यात एकही मलेरियाचा रुग्ण आढळला नाही. शिवाय चिकनगुनिया तपासणीसाठी घेण्यात आलेल्यापैकी एकही रुग्ण आढळुन आला नाही.

तालुकानिहाय डेंगी रुग्णसंख्या
नांदेड वाघाळा महापालीका - ११, हदगाव - एक, भोकर - दोन, नांदेड - पाच, मुखेड - एक, लोहा - दोन, कंधार - चार, नायगाव - एक, बिलोली - एक, देगलूर - एक, एकुण - २९.

जिल्हा हिवताप कार्यालयाचे आरोग्य कर्मचारी गावागावात जाऊन साथीच्या रोगाबद्दल जनजागृती करत आहेत. त्याशिवाय साठलेल्या पाण्याच्या डबक्यात गप्पे मासे देखील सोडण्यात येत आहेत. नागरिकांनी देखील पावसाळ्यात घरात जास्त पाण्याची साठवण करुन ठेवू नये, घरातील व शेजारी असलेल्या व्यक्तीचा आजारापणाबद्दल माहिती द्यावी. त्यामुळे कुठलाही साथीचा आजाराचा फौलाव होणार नाही व साथ रोग लवकर नियंत्रणात येईण्यात मदत होईल.
- डॉ. अकाश देशमुख, जिल्हा हिवताप अधिकारी, नांदेड.

टॅग्स :Dengue