जनावरांच्या गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करा- आमदार बालाजी कल्याणकर 

प्रल्हाद कांबळे
Saturday, 29 August 2020

हा आजार प्रामुख्याने गाय आणि बैल या पाळीव जनावरांना होत असल्याचे आढळून येत आहे. जनावरांची भूक मंदावणे, अंगावर गाठी येणे असे लक्षण आढळून येत आहेत.

नांदेड : शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना मागील काही दिवसांपासून लम्पी स्कीन या आजाराची लागण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. हा आजार प्रामुख्याने गाय आणि बैल या पाळीव जनावरांना होत असल्याचे आढळून येत आहे. जनावरांची भूक मंदावणे, अंगावर गाठी येणे असे लक्षण आढळून येत आहेत. याबाबत आमदार बालाजी कल्याणकर यांनी मतदार संघातील काही गावात जाऊन जनावरांची पाहणी करुन पशुवैद्यकीय व पशुपालकांना गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करुण घेण्याचे आवाहन केले. 

जनावरांना लम्पी स्कीन या आजाराने ग्रासले आहे. अशा जनावरावर तात्काळ उपचार करण्याबाबत पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या. तसेच शेतकऱ्यांनी देखील जनावरांचा गोठा निर्जंतुकीकरण करून घ्यावा असे आवाहन यावेळी आमदार कल्याणकर यांनी केले आहे. जनावरांमध्ये होणाऱ्या संसर्गामुळे हा आजार वाढू लागल्याने शेतकऱ्यांना पुन्हा चिंतेने ग्रासले आहे. या आजाराचा प्रसार कीटकापासून होत असल्याने आपल्या गोठ्यातील कीटकांचा बंदोबस्त करावा. गोठा नेहमी कोरडा आणि स्वच्छ ठेवावा. गोठ्याच्या शेजारी पाणी जमा होऊन चिखल होणार नाही याची काळजी घ्यावी.

हेही वाचा नांदेड : जिल्ह्या्तील टंकलेखन आणि लघुलेखन इन्स्टीट्युटला अटी व शर्तीनुसार परवानगी -

गोठ्यामध्ये फवारणी केल्यास सर्व प्रकारच्या कीटकांचे निर्मूलन

कीटकनाशकाचा वापर करावा तसेच कीटकनाशक घरीच बनविण्यासाठी 10 लिटर पाण्यात 40 मिलिलिटर करंज तेल, 40 मिलिमीटर नीम तेल आणि पन्नास ग्राम अंगाची साबण चांगली मिसळून घ्यावी व दिवसातून दोन- तीन वेळा फवारल्यास आपल्या गोठ्यामध्ये सर्व प्रकारच्या कीटकांचे निर्मूलन होते अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बारडकर यांनी शेतकऱ्यांना दिली. तसेच आमदार बालाजी कल्याणकर यांनी मतदारसंघातील गावांना भेटी देऊन जनावरांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बारडकर तसेच लिंबगाव पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती. सर्वच गावातील जनावरांना प्रतिकारशक्ती वाढवणारे औषध वाटप करून जनावरांची पाहणी करावी तसेच जनावरांना अशी काही लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ते उपचार करावे अशा त्यांनी सुचना दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disinfect cattle sheds MLA Balaji Kalyankar nanded news