esakal | 'एक रस्ता बारा भानगडी'; तामसा येथील राष्ट्रीय महामार्ग कामाची व्यथा
sakal

बोलून बातमी शोधा

प्रस्तावीत  तामसा रोड

'एक रस्ता बारा भानगडी'; तामसा येथील राष्ट्रीय महामार्ग कामाची व्यथा

sakal_logo
By
शशिकांत धानोरकर

तामसा ( जिल्हा हदगाव ) : तामसा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग कामातील अडथळ्यांची शर्यत लांबतच असून संबंधित यंत्रणेची गुळमूळ भूमिका बघता शहरातील महामार्गाची अवस्था 'एक रस्ता बारा भानगडी' अशी झाली आहे. वीज वितरण कार्यालय परिसर ते भोकर वळणरस्त्यापर्यंत राष्ट्रीय महामार्ग कामाचे चौपदरीकरण काम दोन वर्षापासून चालू आहे. शंभर फूट रुंद असलेल्या या रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे. प्रस्तावित चौपदरी रस्त्यात कोणाची मालकी जागा नसल्याने रस्त्याचे काम निर्धोक होणे आवश्यक होते. पण सुरुवातीपासूनच संबंधित एजन्सीने इस्टिमेटनुसार काम करण्याचे टाळत सूचना ऐकण्याची घेतलेली भूमिका आता मात्र डोकेदुखीची ठरत आहे.

अनेक ठिकाणी एजन्सीने मात्तब्बरांच्या अतिक्रमित जागा, बांधकाम, ओटे आदी आदींना हात न लावता रस्त्याची रुंदी कमी केल्याच्या आरोपांचे अद्यापही खंडन करण्याचे धाडस केले नाही. कामाच्या बाबतीत एजन्सीने ऐकण्याला सुरु करताच सांगणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. अनेक ठिकाणी महामार्गाच्या नालीवर नव्याने अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणधारकांनी आठ दिवसापर्यंत रस्ता महामार्ग कामाला थांबविण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. महामार्गातील जुने घरगुती बोअर शाबूत बघून मागील आठवड्यात महामार्गतच नवा बोअर खोदण्याचे धाडस झाले आहे. रस्त्यातील बांधकामाचा अडथळा दूर करण्याला एजन्सी अद्यापही धजावत नाही.

हेही वाचा - बिलोली दौऱ्यात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा, शासकिय कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांपेक्षा नेते, कार्यकर्त्यांचीच गर्दी. शिवसेनेकडून काळे झेंडे

स्थानिक राजकीय समाजसेवकांच्या कमालीच्या हस्तक्षेपापुढे एजन्सी व शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ऐकण्याची घेतलेली भूमिका आता त्रासदायक ठरत आहे. अतिक्रमणधारकाडून रात्रीतून सोयीच्या नाल्या उभारण्याच्या प्रकारावरुन रात्री वाद होण्याची घटना घडली आहे. नव्याने होत असलेल्या या महामार्गाचे नियोजन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवून केले आहे. राज्य व आंतरराज्य वाहतूकीच्या दृष्टीने हा महामार्ग महत्त्वाचा असून तामसा शहराच्या विकासासाठी उपयुक्त ठरणारा आहे. पण स्वार्थापायी या महामार्गाचे काम अर्धे पूर्ण झाल्यानंतर दुर्देवाने अनावश्यक विरोध होत आहे. काहींनी महामार्गातील प्रस्तावित दुभाजक वगळण्याची अप्रस्तुत मागणी पुढे केली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूचा पंधरा ते वीस फुटाचा सर्विसरोड अनेकांनी ढापला आहे.

येथे क्लिक करा - भाजपने सत्तेच्या काळात चुकीचे कायदे केले- अशोक चव्हाण

अतिक्रमण वाढविण्याच्या हेतूने काही ठिकाणी वीजखांब महामार्गमध्ये बसविण्यात अनेकांना यश आल्याची चर्चा आहे. हा प्रकार पैशाच्या जोरावर झाल्याची शक्यता आहे. ज्यांनी आपले अतिक्रमण वाचवण्यात यश मिळविले, ते मात्र सहीसलामत सुटल्याच्या समाधानात आहेत. ज्यांच्या कुटुंबीयांची पोटे हातावरील कामावर आहेत, त्यांच्यासाठी मात्र दुकाने उठल्यामुळे दुर्दैवी वेळ येणार आहे. महामार्ग कामाशी संबंधित एजन्सी व शासन विभाग मात्र रस्ता रुंदीकरणातील भेदभावाच्या आरोपाचे खंडन करत नसल्यामुळे पाणी चांगलंच मुरल्याचा 'अर्थ' काढला जात आहे. रस्ता रुंदीकरणाचे शंभर फुटाचे मोजमाप स्वतंत्र एजन्सीकडून करीत याकामी कथित कर्तव्यकसूर करणाऱ्याविरुद्ध कार्यवाही होण्याची मागणी होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image