जिल्हा प्रशासन पदवीधर मतदान प्रक्रीयेसाठी सज्ज-जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

शिवचरण वावळे
Saturday, 28 November 2020

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार असून, यासाठी ४९ हजार २८५ मतदार मतदान करणार आहेत. यात ३८ हजार ४३२ पुरुष, दहा हजार ८५३ महिला मतदारांचा समावेश आहे. 

नांदेड - जिल्ह्यातील १२३ मतदान केंद्रांवर पदवीधर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज असून, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर समांतर अंतर राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून सर्वती खबरदारी घेतली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. 

सोमवारी (ता.एक) डिसेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक विषयी माहिती देण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या दालनात शनिवारी (ता.२८) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महापालिकेचे आयुक्त डॉ.सुनील लहाने, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांची उपस्थिती होती. 

हेही वाचा- नांदेड : राज्यातील सर्व न्यायालये एक डिसेंबरपासून दोन सत्रात सुरु होणार

पूर्वीपेक्षा निवडणूक अधिक सुकर होईल

पदवीधर निवडणूकीसाठी ३५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रावरील सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिली. गेल्या निवडणूकीपेक्षा यंदा उमेदवार आणि मतदार यांना थेट स्टेजवर मतदानाचे प्रात्यक्षिक दाखविल्याने ही निवडणूक अधिक सुकर होणार आहे. ज्येष्ठ आणि अपंग पदविधर मतदार यांच्यासाठी पोस्टल मतदान प्रक्रिया राबविली गेली आहे. त्यामुळे त्यांना मतदान केंद्रावर येणाचा त्रास कमी होणार आहे. दरवर्षी एसटी महामंडळाकडून मोठ्या बसेस लावल्या जातात. परंतू, यंदा पहिल्यांदाच सात मिनी, १०२ बोलेरो गाड्यासोबतच १०९ व्हेईकल लावण्यात आल्या आहेत. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड : पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा

प्रत्येकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे 

मतदान केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड दिल्या जाणार आहेत. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या तोंडावर मास्क असणे बंधनकारक आहे. ज्यांच्याकडे मास्क नाही अशा मतदारांना मास्क पुरविले जातील, त्यांची थर्मल स्क्रीनिंग होणार आहे. दरम्यान, ज्यांना कोरोनाची कुळलीही लक्षणे आढळून आली त्या मतदारांसाठी केंद्रावर उभारलेल्या फिवर क्लिनीकमध्ये ठेवले जाईल, अशा मतदारास सर्वात शेवटी मतदान करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मागील निवडणूकीत केवळ २० ते २२ टक्के इतके मतदान झाले होते. यंदा मात्र जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे आवाहन देखील डॉ. इटनकर यांनी केले आहे. 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार असून, यासाठी ४९ हजार २८५ मतदार मतदान करणार आहेत. यात ३८ हजार ४३२ पुरुष, दहा हजार ८५३ महिला मतदारांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District administration ready for graduate voting process-Collector Dr. Vipin Itankar Nanded News