Nanded : शेतकऱ्यांनी जाग्यावर सोडली फुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Festival Farmers Flowers Damage

Nanded : शेतकऱ्यांनी जाग्यावर सोडली फुले

परभणी : दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी झेंडूंची फुले विक्रीस आणलेल्या जिल्ह्यासह परजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाव गडगडल्यामुळे व फुकटही कुणी फुले घेत नसल्यामुळे अखेर जाग्यावरच फुले सोडून घर गाठले. त्यामुळे मंगळवारी शहरातील बहुतांश मुख्य रस्त्यांवर कोमेजलेल्या फुलांचे ढिगारेच ढिगारे लागले होते.

दिवाळीच्या सणात महालक्ष्मीपूजनाला झेंडू फुलांची मागणी लक्षात घेऊन मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची आपली झेंडूची फुले शहरात विक्रीसाठी आणली होती. सोमवारी (ता.२४) पहाटेपासून वसमत रस्ता, गंगाखेड रस्ता, पाथरी रस्ता, जिंतूर रस्ता या प्रमुख रस्त्यांच्या शहरातील गांधी पार्क, गुजरी बाजार, नांदखेडा रोड या भागातील रस्त्यांवर विक्रीसाठी आणलेल्या फुलांचे ढिगारे लागले होते.

गल्लोगल्लीतही हातगाडेवाले विक्रीसाठी फुलांचे गाडे घेऊन फिरत होते. त्यामुळे शहरात सर्वत्र झेंडूंची फुले दिसून येत होती. त्यामुळे भाव पडणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

ग्राहक रस्त्यावर आलेच नाहीत

शहरातील काही व्यापाऱ्यांनी आलेल्या शेतकऱ्यांकडून फुले विकत घेऊन त्यांची गल्लोगल्लीत ३०-४० रुपये दराने विक्रीदेखील सुरू केली होती. दसऱ्याच्या वेळेस झेंडूच्या फुलांचा भाव ६० रुपयापासून ३० रुपयापर्यंत आला होता.

त्यामुळे अनेकांनी दारासमोरच आलेली फुले कमी भावाने मिळत असल्यामुळे तेथेच खरेदी करण्यास पसंती दिली. त्यामुळे बाजारपेठेत जाऊन फुले खरेदीसाठीची संख्या कमी झाली. त्याचादेखील शेतकऱ्यांच्या फुले विक्रीवर झाला.

झेंडूंच्या फुलांची आवक वाढली, ग्राहकही कमी झाल्याचे लक्षात येताच, मिळतील त्या दराने शेतकरी फुले विक्री करू लागले. ३० रुपयांपासून शेवटी पाच रुपयापर्यंत भाव कमी झाला. परंतु, सायंकाळपर्यंत ग्राहकच नसल्याने व फुकटही कुणी विचारीत नसल्यामुळे शेवटी आलेल्या शेतकऱ्यांना नाइलाजाने आपली फुले जागेवरच सोडून घराकडे परतण्याची वेळ आली.