नांदेडला डॉक्टर - परिचारिकांमध्ये सुटीवरुन होतोय भेदभाव... 

शिवचरण वावळे
Saturday, 22 August 2020

कोरोना संसर्गाच्या काळात कोविड योद्धा म्हणून डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देणाऱ्या परिचारिका, ब्रदर्स आणि डॉक्टर यांच्यात सुटीच्या बाबतीत भेदभाव केला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे. त्यामुळे हा तिढा सुटण्यासाठी आता वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. 

नांदेड : डॉक्टर हे त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असले तरी त्यांना सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या परिचारिका व ब्रदर्संना मागील पाच महिन्यापासून डॉक्टराच्या बरोबरीने कोविड वार्डातील रुग्णांसोबत राहून त्यांची देखभाल करावी लागत आहे. कोरोना वार्डाचा रुग्णसेवेचा अर्धाअधिक भार परिचारिकांच्या खांद्यावर असतो. वार्डातील डॉक्टरांना एक आठवडाभर रुग्णसेवा केल्यानंतर आठवडाभर विश्रांतीसाठी (क्वारंटाईन) सुटी दिली जाते. दुसरीकडे मात्र, कोरोना वार्डात डॉक्टरांबरोबर काम करणाऱ्या परिचारीका व ब्रदर यांना एक आठवडा काम करुन देखील सात दिवसासाठी क्वॉरटाईन होण्यासाठी सुटी दिली जात नाही.

त्यामुळे कोरोनाच्या वार्डात काम करणाऱ्या ब्रदर, परिचारिकांचा आरोग्याचा प्रश्‍न तर निर्माण झाला आहे. शिवाय सतत कोरोना वार्डात ड्युटी करावी लागत असल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबांतील सदस्य, मुलांपासून देखील अनेक दिवस दूर रहावे लागत आहे. त्यामुळे आता कोरोना वार्डात काम करणाऱ्या या ब्रदर, परिचारिकांसोबत होत असलेल्या अन्यायाविरोधात संघटनेच्या वतीने आवाज उठविण्यास सुरुवात झाली आहे. 

हेही वाचा - Video - वझरा शेख फरीद धबधबा पर्यटकांविनाच कोसळतोय, कुठे ते वाचाच

वरिष्ठांकडे मांडली व्यथा 

महाराष्ट्र परिचारिका संघटनेच्या वतीने सर्वप्रथम विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांना निवेदन देऊन परिचारिकांसोबत होत असलेल्या भेदभावाची व्यथा मांडली आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - दाभोलकर - पानसरे हत्येच्या तपासाचे काय? - आमदार राजूरकरांचा सवाल.... ​

एक दिवस काम बंदचा इशारा 

संघटनेचे पदाधिकारी इतक्यावरच न थांबता त्यांनी पुढील महिन्यात ता. एक ते ता. सात सप्टेंबर काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे स्पष्ट केले असून ता. आठ सप्टेंबरला एक दिवस काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. काम बंद आंदोलनादरम्यान कोविड योद्धा म्हणून परिचारिकांची वेगळी टिम कोरोना वार्डात कर्तव्यावर असणार आहे. त्यामुळे संपादरम्यान एकाही रुग्णास त्रास होणार नाही. यासाठी देखील खबरदारी घेतली जाणार असल्याचे देखील संघटनेच्या सदस्याने सांगितले. 

लवकरच तोडगा निघावा 

कोरोना वार्डात आम्ही डॉक्टरांबरोबर काम करत आहोत. मग डॉक्टरांप्रमाणे आम्हाला होम क्वारंनटाईनसाठी सात दिवस सुटी का दिली जात नाही. आमच्यावर होत असलेला सततचा अन्याय दूर व्हावा, यासाठी अधिष्ठाता, स्थानिक आमदार व जिल्हाधिकारी यांना देखील आॅनलाइन निवेदन पाठविले आहे. यावर लवकरच तोडगा निघावा, अन्यथा आम्हाला काम बंद आंदोलन करावे लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. 
- ॲड. रवी शिसोदे, कोषाध्यक्ष, महाराष्‍ट्र राज्य परिचारिका संघटना. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors And Nurses In Nanded Are Being Discriminated Against On Leave Nanded News